BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: पालिका आयुक्तांच्या घरी बाप्पा !; कला साहित्यांची पर्यावरणपूरक आकर्षक आरास

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – घरात गणपती म्हटलं की त्याच्यासाठी खास सजावट केली जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या घरच्या गणेशासमोर आकर्षक आरास करण्यात आली आहे. विद्या आणि कलेची देवता असलेल्या गणपतीसमोर विविध कला साहित्यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. त्यामध्ये हार्मोनियम, तबला, तंबोरा तसेच पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे. त्यातून पर्यावरण संवर्धन आणि कलेचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडीतील बंगल्यावर मोठ्या उत्साहात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आयुक्तांचा घरी अनेक वर्षांपासून गणपती बसविला जातो. त्यांच्या घरी पाच दिवसांचे बाप्पा येतात. दरवर्षी गणपती समोर वेगवेगळी आकर्षक अशी आरास केली जाते. यंदा गणपतीसमोर पर्यावरणपूरक कलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे.

‘एमपीसी न्यूज’शी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “दरवर्षी आमच्या घरी गणपती बसविला जातो. यंदा पर्यावरणपूरक आरास तयार केली आहे. आरास करण्यासाठी सन 1992 पासून थर्मोकोलचा वापर बंद केला आहे. तर, सन 1991 पासून गणपतीचे विर्सजन करण्याचे बंद केले आहे. देव्हा-यातीलच मूर्ती प्रतिष्ठापीत केली जाते. घरामध्येच पाण्यात विसर्जित केले जाते आणि पुन्हा ती मूर्ती देव्हा-यात ठेवली जाते. गणपतीनिमित्त दरवर्षी वेगवेगळी थिम घेऊन आरास केली जाते.

यावर्षी कलांचा अधिपती ही थीम घेतली आहे. सगळ्या कला या देखाव्यात मांडल्या आहेत. ठेवल्या आहेत. त्यामध्ये भारतीय संगीताची वाद्ये, लेखन साहित्य, पॉटरी, पेटिंग, फोटोग्राफी, ग्लासवर्क, घुंगरु, सावंतवाडीतील लाकडी खेळणी, पुस्तके, कवितासंग्रह, कागद असे बरेच कला साहित्य ठेवण्यात आले आहे. गणपती ही कलेची देवता आहे. त्यामुळे कलांची आरास तयार केली आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A4

.