Pimpri: जुन्या निविदेचा झाला कचरा ; आता कचरा संकलनासाठी पालिकेने मागविल्या फेरनिविदा

महापालिकेने मागविल्या नव्याने चार निविदा; वार्षिक 51 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कचरा संकलन व कचरा वहन कामासाठी काढलेली वादग्रस्त निविदा रद्द झाल्यानंतर आयुक्तांनी तब्बल पाच महिन्यानंतर कचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी नव्याने चार निविदा मागविल्या आहेत. प्रतिटन 1641 हा दर गृहित धरत वर्षभरासाठी 51 कोटी रुपयांचा खर्च ग्राह्य धरला आहे. दोन क्षेत्रीय कार्यालयांसाठी एका ठेकेदाराची नेमणूक केली जाणार असून कंत्राटासाठी आठ वर्षाचा कार्यकाल निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, यासाठी नाशिक महापालिकेच्या निविदा दराचा आधार घेण्यात आला आहे.

कचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी मुंबई-पुणे महामार्गाचा आधार घेत सत्ताधा-यांनी दोन निविदा काढल्या. ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स 28 कोटी 52 लाख आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड 27 कोटी 90 लाख रुपयात या दोन कंत्राटदारांना हे काम देण्यास 21 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा विरोध डावलून सत्ताधारी भाजपने बहुमताचा जोरावर मंजुरी दिली. तथापि, विरोधकांनी यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी केली.

त्यानुसार राज्याच्या नगरविकास विभागाने महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कक्षाच्या तज्ज्ञांमार्फत या कंत्राटाची सखोल चौकशी केली. निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा अहवाल राज्य सरकारने 10 एप्रिल रोजी महापालिकेला दिला होता. तथापि, सत्ताधा-यांनी 11 एप्रिल 2018 रोजीच्या स्थायीमध्ये कचरा संकलन आणि वाहतूक कामाचा ठेका रद्द करत फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्य सरकारचा अहवाल दप्तरी दाखल करण्याचा ठराव 2 मे 2018 रोजी केला.

त्याचबरोबर आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी आठ कंत्राटदार नेमण्याचा ठराव केला. त्यानंतर आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक ऐवजी दोन क्षेत्रीय कार्यालयांसाठी एक कंत्राटदार नेमावा अशी दुरुस्ती स्थायी समितीने केली.

त्यानंतर 7 मे 2018 रोजी आयुक्तांनी कचरा संकलन व वाहतूक कामाची निविदा रद्द केल्याचे कंत्राटदारांना कळविले. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी मेसर्स क्रिसील रिस्क अ‍ॅण्ड इन्फा सोल्युशन्स या सल्लागार संस्थेची नियुक्ती केली. त्यानुसार या सल्लागार संस्थेने ‘अ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय 13 कोटी 17 लाख, ‘ब’ आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय 15 कोटी 30 लाख, ‘क’ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय 10 कोटी 91 लाख आणि ‘ग’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयासाठी 11 कोटी 42 लाख रुपये या प्रमाणे चार निविदा तयार केल्या आहेत. त्यानुसार महापालिका आता चार निविदा मागविणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.