Pune : वीज दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- वीज दरवाढीवरून आता राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.  वीज दरवाढीच्या विरोधात आज, मंगळवारी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने रास्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आधीच इधन दरवाढीच्या भस्मासुराने जनतेचे जनतेचे कंबरडे मोडले असताना आता वीज दरवाढीचा महाधक्का बसल्याने विरोधक सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. याचाच भाग म्हणून पुण्यात शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली वीज दरवाढ रद्द व्हावी म्हणून महावितरणाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्य वीज नियामक आयोगाने नुकतेच मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या तीन आणि मुंबईतील उपनगरांसह राज्यात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या वीज दरवाढ प्रस्तावावर निर्णय देताना वीजदरात कपात करत बेस्टच्या वीजग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. तर याउलट महावितरणच्या वीजदरात सध्या सरासरी 5 टक्के दरवाढ लागू करताना 12 हजार 382 कोटी रुपयांची दरवाढ तूर्तास लांबणीवर टाकली आहे. नवीन दर 1 सप्टेंबर 2018 पासून लागू झाले आहेत.

“या सरकारने प्रत्येक वस्तूवर दर वाढ करण्याची स्पर्धा लावली आहे. या दरवाढीने जनतेचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढ तर रोज करतात मात्र आता वीज दरवाढ करून या भाजप सरकारने जनतेला मेटाकुटीला आणले आहे. ही दरवाढ रद्द नाही केली तर रस्त्यावर उतरून अजून तीव्र आंदोलन केले जाईल” असे रमेश बागवे म्हणाले.

दरम्यान, महावितरणच्या दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांची वीज 24 पैशांनी (4.8 टक्के) महाग झाली आहे. सध्या 5.07 रुपये प्रति युनिट वीजदर होता. तो आता 5.31 रुपये झाला आहे. तर 101 ते 300 युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांसाठीचा वीजदर 8.74 रुपये होता. तो 21 पैशांनी (2.40 टक्के) वाढून 8.95 रुपये झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.