Pune: विद्यापीठ अधिसभेवर पिंपरी पालिकेतील एका नगरसेवकाची नियुक्ती होणार !

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर सन 2018-19 साठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका नगरसेवकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. नगरसेवकांपैकी किमान पदवीधर असलेल्या एका नगरसेवकाचे नाव विद्यापीठाच्या निवडणूक विभागाकडे पाठविण्यात यावे, असे पत्र पुणे विद्यापीठ निवडणूक विभागाच्या उपकुलसचिवांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजप कोणत्या नगरसेवकाला विद्यापीठावर काम करण्याची संधी देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार कुलगुरुंनी विद्यापीठ क्षेत्रातील नगरपालिका किंवा महापालिका सदस्यांपैकी एका सदस्याचे विद्यापीठ अधिसभेवर एक वर्षासाठी नामनिर्देशन करण्याची तरतूद आहे. एक वर्षासाठी ही निवड केली जाते. यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर सन 2018-19 साठी पालिकेच्या एका नगरसेवकाची नियुक्ती केली जाणार आहे.

पालिकेच्या नगरसेवकांपैकी किमान पदवीधर असलेल्या एका नगरसेवकाचे नाव विद्यापीठाच्या निवडणूक विभागाकडे पाठवावे, असे पत्र विद्यापीठाच्या निवडणूक विभागाच्या उपकुलसचिवांनी पालिकेला पाठविले आहे. सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाला पुणे विद्यापीठावर काम करण्याची संधी मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.