Pune : नोटबंदी काळात सर्वात जास्त रक्कम जमा झालेल्या देशातील 10 सहकारी बँकामध्ये पुणे जिल्हा सहकारी बँक तिसऱ्या क्रमांकावर !

एमपीसी न्यूज – 8 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या नोटबंदी नंतर देशातील ज्या 10 जिल्हा सहकारी बँकांमध्ये सर्वाधिक 500 आणि 1000 च्या नोटा जमा केल्या त्या सर्व बँकांचे संचालक हे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांचे नेते आहेत. आणि यात विशेष बाब म्हणजे देशातील या 10 बँकांमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारांच्या नेतृत्वाखाली चालणारी पुणे जिल्हा सहकारी बँक ही तिसऱ्या क्रमांकावर आहे.

नेशनल बैंक फॉर एग्रीकल्चर एंड रूरल डेवलपमेंट (नाबार्ड) यांनी एका माहिती अधिकाराच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. नाबार्डने दिलेल्या माहितीनुसार देशातील 370 जिल्हा सहकारी बँकांमध्ये 10 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2016 च्या दरम्यान 22 हजार 270 कोटी रुपयांच्या 500 आणि 1000 च्या नोटा जमा केल्या गेल्या.

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर नोटा बदलून घेण्यासाठी 50 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, या निर्णयाच्या 5 दिवसानंतर म्हणजे 14 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारकडून सहकारी बँकामध्ये नोटा बदलून न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नाबार्डने दिलेल्या माहितीनुसार एकूण 370 सहकारी बँकामध्ये जमा झालेल्या 22 हजार 270 कोटी रुपयांपैकी 18.28 टक्के म्हणजे जवळ जवळ 4 हजार 191.39 कोटी रुपये या दहा बँकामध्ये जमा केले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये ४ बँका गुजरात , 4 महाराष्ट्र, 1 हिमाचल प्रदेश आणि 1 कर्नाटक मध्ये आहे.

या बँकांच्या क्रमवारीत सगळ्यात वर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक आहे. या बँकेचे संचालक भाजप अध्यक्ष अमित शाह हे असून भाजप नेता अजयभाई एच पटेल हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. या बँकेमध्ये नोटबंदीच्या काळात 745.59 कोटी रुपयांच्या नोटा जमा केल्या गेल्या आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर राजकोट जिल्हा सहकारी बँक आहे. या बँकेत 693.19 कोटी रुपयांच्या नोटा जमा केल्या गेल्या. या बँकेचे चेरमन जयेशभाई विट्ठलभाई रदाडीया आहेत. ते आता गुजरातच्या विजय रूपाणी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.

तर तिसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्हा सहकारी बँक. राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात या बँकेचे अध्यक्ष आहेत तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या बँकेचे संचालक आहेत. या बँकेत नोटबंदीच्या काळात 551.62 कोटी रुपये जमा केले गेल्याची माहिती नाबार्डने दिलेल्या उत्तरात मिळाली आहे.

दरम्यान, नोटबदलीचा निर्णय जाहीर झाल्यावर केंद्र सरकारने जिल्हा बँकांना नोटबदलीची परवानगी दिली नाही. याची कारणे जरी आर्थिक असली, तरी त्याचा फटका शेतक-यांना बसलाय. कारण ग्रामीण भागात अनेक शेतक-यांची खाती सहकारी बँकांमध्ये आहेत, आणि त्यात भर म्हणजे गावाकडे राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांच्या तेवढ्या शाखाही नाहीत. तसंच रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना नोट स्वीकारण्यास मनाई केली. अस मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळोवेळी मांडले होते. तर नोटा बदलण्याची मुभा सहकारी बँकांना देखील मिळावी यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी वारंवार चर्चा देखील केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.