Sangvi : आज बाप्पाला निरोप द्यायचा की भारत पाक सामना पाहायचा ?; गणेशभक्तांपुढे मोठा पेच

एमपीसी न्यूज – गणेश उत्सवाच्या सातव्या दिवशी सांगवी मधील बाप्पाला निरोप दिला जातो. वाजत-गाजत मोठी मिरवणूक काढून भक्तिपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण आज गणेश भक्तांच्या मनात मोठा पेच निर्माण झाला आहे. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने सुरु असून या सामन्यातील सर्वात रोमांचक सामना म्हणजेच भारत-पाकिस्तान सामना आज होणार आहे. त्यामुळे बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढायची की क्रिकेट मॅच बघायची, ही संभ्रमावस्था सांगवीकर गणेश भक्तांच्या मनात निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. गणेशोत्सवात सर्वच क्षेत्रातील गणेश भक्त सुट्ट्या घेतात. खास बाप्पांची सेवा करण्यासाठी सर्व कामे गणेश उत्सवानंतर करण्यावर प्रत्येकाचा भर असतो. गणपती उत्सवादरम्यान फक्त आणि फक्त आरास, सजावट, गाणी, उपक्रम अशा गोष्टींना उधाण आलेले असते. बाप्पाची सेवा करायची, आशीर्वाद घ्यायचा, मोदक खायचे, गावभर गणपती बघत हिंडायचे. कुणाची सजावट चांगली, कुणाची बाप्पाची मूर्ती चांगली तर कुणाचा देखावा चांगला यांसारख्या गप्पांमध्ये संपूर्ण दिवस निघून जातो.

बाप्पा इतकाच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे क्रिकेट. त्यात भारत पाक हा सामना असेल तर मग बघायलाच नको. काहीजण जेवण करणार नाहीत, पण हा सामना पाहतील. भारत पाक हा क्रिकेटचा सामना बघणे म्हणजे एक प्रकारे देशभक्ती असे वातावरण संपूर्ण भारतात आहे. त्यात आज सांगवी परिसरातील आज गणेश विसर्जन आहे. सांगवीकर गणेश विसर्जनासाठी खास तयारी करतात. ढोल-ताशा पथक, आकर्षक सजावट हे इथल्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य असते. पण भारत-पाक सामन्यामुळे ही मिरवणूक होणार का ? झाली तर कधी ? कशी ? किती वेळात उरकणार ? असे अनेक प्रश्न क्रिकेटप्रेमी गणेश भक्तांच्या मनात तयार झाले आहेत.

यापूर्वी 18 जून 2017 रोजी भारत पाक हा सामना झाला होता. मात्र या सामन्यात भारताला पाक संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मागील वर्षीचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेला भारतीय संघ किती चांगली कामगिरी करतो, त्यासाठी आजचा सामना बघणे आवश्यक आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. 25 हजार प्रेक्षक बसतील एवढी या स्टेडियमची क्षमता आहे. यंदाच्या वन डे क्रिकेट सामन्यांसाठी आजवर जेवढी गर्दी झाली नाही, तेवढी गर्दी आजच्या सामन्यासाठी होणार आहे. भारतीय वेळेप्रमाणे हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरु होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.