Lonavala: सोमवारी मध्यरात्रीपासून लोणावळा सात दिवस लाॅकडाऊन

7 days lockdown in Lonavala from Monday midnight.

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने सोमवारी मध्यरात्रीपासून सात दिवस लोणावळा शहर लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी रवी पवार यांनी दिली. शुक्रवार व शनिवार दोन दिवसात लोणावळ्यात कोरोनाचे दहा रुग्ण मिळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनामुक्त लोणावळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला व तो वेगाने वाढत असल्याने ही साखळी तोडण्यासाठी सदरचा लाॅकडाऊन करण्यात येणार आहे.

लोणावळा शहरात शुक्रवारी पाच व शनिवारी प‍ाच कोरोना रुग्ण मिळून आले असून 13 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

लोणावळा शहरात आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या 28 झाली असून पाच जणांच्या नोंदी नवी मुंबई येथे झाल्या आहेत.

लोणावळ्यात कोरोना नसल्याने येथील बाजारपेठ नियमित सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान सुरू होती. मात्र तरीदेखील बाजारातील गर्दी कमी होत नसल्याने व कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाने लोणावळा सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यापैकी पहिले चार दिवस कडकडीत बंद असेल या काळात फक्त मेडिकल व दवाखाने सुरु राहतील. दुध केंद्र सकाळी दोन तास खुली राहतील.

चार दिवसानंतर किराणा व भाजीपाला दुकानांना दोन ते तीन तास उघडण्याची मुभा दिली जाईल असे मुख्याधिकारी रवी पवार यांनी सांगितले.

दोन दिवसात नागरिकांनी बाजारात गर्दी न करता सात दिवस पुरेल ऐवढेच साहित्य खरेदी करावे अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.