सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

लहान मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करणा-या 70 वर्षीय नराधमास अटक

आरोपी पुण्याच्या नारायण पेठेतील रहिवाशी

एमपीसी न्यूज – लहान मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणा-या 70 वर्षीय नराधमास पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या आदेशाने जेरबंद करण्यात आले. पोलीस निरिक्षक बाळासाहेब सुर्वे यांनी अटक केली. आरोपीने अनेक लहान मुलांवर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे. परंतू एका मुलाने धाडस करत पोलीस उपायुक्त हिरेमठ यांच्याकडे तक्रार केली, आणि या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर उपायुक्तांनी आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले.

ओंकार धोंडीबा गायकवाड (वय-70, रा.289, नारायण पेठ, पुणे) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. 2007 मध्ये त्याच्या विरोधात नारायण पेठेतील अंदाजे दीडशे नागरिकांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, लोकपाल, सर न्यायाधीश यांच्याकडे तक्रार केली होती. माजी पोलीस आयुक्त उमरानीकर हे त्याचे भाडेकरु होते, त्यांनी घर खाली करावे याकरीता त्यांच्या विरोधात अनेक खोटे अर्ज केले होते. आरोपी जर पोलीस आयुक्तांना त्रास देतो तर सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही हे गृहीत धरुन त्याच्या विरोधात तक्रार करण्याची हिम्मत कुणीही करत नसे. आरोपीचा मुलगा वकील असल्यामुळे तो वडीलांना पोलिसांच्या तावडीतून लगेच सोडवणार हे माहीत असल्यामुळेही नागरिक पुढे येत नव्हते.

काही वर्षापूर्वी मोहिनीराज कुलकर्णी या 80 वर्षाच्या नराधमाने 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन तिचा खून केला होता. गायकवाड हा सुद्धा त्याच्या शेजारीच राहतो. आरोपी हा महिलांकडे वाईट नजरेने बघतो, अंतर्वस्त्रांवर बाहेर फिरतो, अश्या अनेक बाबी अर्जामध्ये नमुद आहेत.

आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा जामीनावर सुटल्यावर तो परत नागरिकांना त्रास देईल, असे एका नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, तो पुढे म्हणाला आरोपी हा त्याच्या वकील मुलाच्या मदतीने नक्कीच बदला घेईल, त्याकरीता तक्रारदाराला पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

spot_img
Latest news
Related news