Pune : पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांची जुगलबंदी रंगणार

आनंद संघा'तर्फे 30 सप्टेंबर रोजी पुण्यात ''गुरु-वंदना'' कार्यक्रम

एमपीसी न्यूज- क्रियायोग परंपरेतील एक अवतारपुरुष मानले जाणारे परमहंस योगानंद यांचे शिष्य स्वामी क्रियानंद यांनी स्थापन केलेल्या ”आनंद संघ” या संस्थेतर्फे प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा आणि प्रख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या जुगलबंदीचा ‘गुरु-वंदना’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गणेश कला क्रीडा मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात पुण्यातील रसिकांना या दोन दिग्गज कलाकारांच्या जुगलबंदीचा आस्वाद घेता येणार आहे. या मैफिलीत ‘शिव-हरी’ यांना पं. विजय घाटे आणि पं. भवानीशंकर यांची सुरेल साथसंगत लाभणार आहे.

परमहंस योगानंद यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रारंभी पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते भारतीय कलेवर आधारित स्वामी क्रियानंद यांनी लिहिलेल्या ” आर्ट अॅज ए हिडन मेसेज ” या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. याप्रसंगी आनंद संघाचे जागतिक प्रमुख धर्माचार्य स्वामी ज्योतिश नोवाक, सीबीआयचे माजी संचालक आणि मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष डी. आर. कार्तिकेयन, परमहंस योगानंद चैरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका पिया सिंग, संचालक मंजुनाथ किणि, आध्यात्मिक गुरु स्वामी देवी, स्वामी जया, स्वामी ध्याना आणि आनंद संघाचे अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी आनंद संघाचे जागतिक प्रमुख स्वामी ज्योतिश नोवाक यांनी चितारलेल्या तैलचित्रांच्या प्रदर्शनाचे ऑनलाईन उदघाटनही होणार आहे. हे प्रदर्शन पुण्यातील रेंज हिल्स रस्त्यावरील अशोक संकुलात आनंद संघाच्या योगा सेंटर मध्ये रसिकांना सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत पाहता येणार आहे. तसेच csrworld.net या लिंकवर ते ऑनलाईनही पाहता येणार असल्याची माहिती आनंद संघाचे पुण्याचे शाखा प्रमुख डॉ. आदित्य गाईत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांचे सहकारी स्नेहल भट, पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य संतूर वादक दिलीप काळे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

योगसाधना आणि ध्यानधारणा यांच्या आधारे समाजाची उन्नती करण्याचे कार्य स्वामी परमहंस योगानंद ट्रस्टकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे निराधार, विधवा, वृद्ध महिला आणि परित्यक्तांना या ट्रस्टतर्फे कायमस्वरूपी मदत पुरविली जाते. त्याचाच एक भाग म्हणून या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमातून मिळणारे उत्पन्न वृंदावन येथील निराधार महिलांच्या मदतीसाठी दिले जाणार आहे.

कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका bookmyshow.com वर तसेच बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि कमला नेहरू पार्कसमोर शिरीष बोधनी यांच्याकडे २४ सप्टेंबर पासून उपलब्ध राहतील असे आयोजकांनी कळविले आहे. गुरु वंदना हा पुण्यात सम्पन्न होणारा कार्यक्रम वृंदावन मधील विधवा महिलांसाठी ‘लाईव ‘ असणार आहे. सामाजिक जाणिवेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास रसिकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन डॉ. गाईत यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.