Pune : रिटेलमधील परकीय गुंतवणुकीच्या निषेधार्थ शुक्रवारी दुचाकी रॅली

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारने भारतात रिटेलमध्ये 100 टक्के परकीय गुंतवणुकीस परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी (28 सप्टेंबर) पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने दुचाकी रॅली काढून निषेध नोंदविला जाणार आहे. दिल्याने आधीच मॉलमुळे त्रस्त झालेला रिटेल व्यापारी आता उध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सारसबागेतील गणपतीची आरती करून सकाळी 11 वाजता ही दुचाकी रॅली बाजीराव रस्त्याने जुना बाजारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. त्याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. ही दुचाकी रॅली सीएआयटी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा म्हणूनही काढली जाणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

याबाबत सचिन निवंगुणे म्हणाले, ” वॉलमार्टसारख्या कंपन्यांना व्यवसायासाठी 2 टक्क्यांनी कर्ज मिळते तर, आपल्याकडे कर्जावरील व्याजाचा दर 9 ते 18 टक्के आहे. देशात 35 कोटींहून अधिक नागरिक रिटेल व्यवसायातून रोजगार मिळवून जगतात. आणि आपले केंद्र सरकार 7 कोटी लोकांना रोजगार देण्यासाठी 35 कोटी लोकांच्या रोजगारावर पाय देऊन रिटेल व्यवसायात 100 टक्के परदेशी गुंतवणुकीच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत आहे. इतका साधा व सरळ विचार केंद्र सरकारच्या लक्षात येत नाही हेच विशेष आहे. मॉलच्या स्पर्धेत कंबरडे मोडलेला रिटेल व्यापारी या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी कशी स्पर्धा करणार असा प्रश्न निवंगुणे यांनी उपस्थित केला.

आजच्या घडीला अमेरिकेने कायदा करून देशांतील व्यापाराला संरक्षण दिले आहे. चीन, रशिया सर्वजण स्थानिकांना प्रथम प्राधान्य देत असताना आपले सरकार मात्र स्थानिक रिटेल व्यवसाय संपविण्याचे काम करीत आहे, असे सचिन निवंगुणे यांनी सांगितले. रिटेल व्यवसायात काम करणाऱ्यांचे शिक्षण कमी आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढेल अशी चिंता निवंगुणे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.