Pimpri : महापालिकेने क्रीडा धोरण निश्चित करावे – नगरसेवक बाबू नायर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने खेळाडूंसाठी अनेक मैदाने, क्रीडांगणे विकसित केली आहेत. परंतु, त्याचा वापर योग्यपणे होत नाही. देखभाल केली जात नाही. क्रीडा विभागाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यासाठी महापालिकेने शहरातून अधिक खेळाडू घडतील असे क्रीडा धोरण निश्चित करावे, अशी मागणी भाजप सरचिटणीस व नगरसेवक बाबू नायर यांनी केली आहे. तसेच क्रीडा विभागासाठी राखीव ठेवलेला पाच टक्के निधीचा त्यासाठीच खर्च करण्यात यावा. औद्योगिकनगरी बरोबरच शहराची क्रीडानगरी म्हणून ओळख निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे की, क्रीडा विकासाठी वापरु शकता येतील अशा शहरातील मोकळ्या जागा ताब्यात घेण्यात याव्यात. बांधकाम परवानगी विभाग आणि नगररचना विकास विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावे अनेक मोकळ्या जागांचा वापर होत नाही. महापालिका महापौर चषक घेते. परंतु, त्याचा स्थानिक खेळाडूंना उपयोग होताना दिसून येत नाही.

त्यासाठी पालिका आणि खासगी शाळा, महाविद्यालयांमध्ये स्पर्धा घेण्यात याव्यात. त्याचबरोबर औद्योगिक कंपन्यामध्ये महापौर चषक घेण्यात यावा. महापालिकेच्या आठ प्रभागात ज्या परिसरात कोणत्या खेळासाठी चांगले वातावरण आहे. त्याचा अभ्यास करुन त्यानुसार मैदाने विकसित करावीत. खेळाडूंचा विकास होण्यासाठी योग्य सोयी-सुविधा देण्यात याव्यात.

जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत शहराचे नाव उंचाविलेल्या खेळाडूंचा पालिकेतर्फे मान सन्मान राखण्यात यावा. त्यांच्या पुरस्कारांचे जतन करावे. त्यांनी केलेल्या कामगिरीची माहिती नवीन खेळाडूंना द्यावी, जेणेकरुन त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल. नवीन खेळाडू घडविण्यासाठी प्रशिक्षक तयार करावेत. पालिकेच्या क्रीडा पर्यवेक्षकांना वेळोवेळी केंद्र सरकारच्या स्पोर्ट अॅथोरॅटी ऑफ इंडिया (साई) आणि नॅशनल इन्टिट्यूस ऑफ स्पोर्ट या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात यावे. क्रीडापट्टू, खेळाची आवड अथवा माहिती असणा-या स्वतंत्र अधिका-याची क्रीडा विभागासाठी नेमणूक करावी.

क्रीडा समितीच्या सभेला आयुक्तांनी तीन महिन्यातून एकदा उपस्थित रहावे. त्याचबरोबर शहरातील क्रीडांगणे, मैदाने याचा वापर कसा करावा. त्यातून महापालिकेला उत्पन्न कसे मिळेल याचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्यात यावा. शहराची औद्योगिकनगरी बरोबरच क्रीडानगरी अशी ओळख निर्माण व्हावी, असेही नायर यांनी निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाची प्रत सभागृह नेते एकनाथ पवार, क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे यांना देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.