Pune : मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन मजुरांची सुटका (व्हिडिओ)

सांडपाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई करताना कोसळला मातीचा ढिगारा

एमपीसी न्यूज- सांडपाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई काम करताना मातीचा ढिगारा कोसळून दोन मजूर अडकले. सुदैवाने अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत 15 फूट खोल अडकलेल्या मजुरांची सुखरूप सुटका केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एरंडवणे येथील गणेश नगर ऑटो वसाहतीत घडली.

अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरंडवणे येथील गणेश नगर ऑटो वसाहतीत सांडपाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास खोदाई काम करताना मातीचा ढिगारा दोन मजुरांच्या अंगावर कोसळला. घटनेची वर्दी मिळताच एरंडवणे अग्निशमन केंद्रातून वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच अधिकारी राजेश जगताप यांनी परिस्थिती पाहून बचावकार्य सुरु केले. एका बिगाऱ्याला तेथील नागरिकांनी बाहेर काढून दवाखान्यात रवाना केले होते. दुसरे बिगारी लहू धोत्रे (वय 35) हे खाली पंधरा फुट खोल मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने जवळपास गळ्यापर्यंत मातीत अडकले होते. जवानांनी तत्परतेने फावड, टिकाव, पहार व घमेल्याच्या साह्याने अरुंद जागेतून मातीचा ढिगारा दूर करुन धोत्रे यांना धीर देत किमान 20 मिनिटातच सुखरुप बाहेर काढले. बिगारी धोत्रे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचाराकरिता दवाखान्यात रवाना केले आहे.

या बचावकार्यात एरंडवणे अग्निशमन केंद्राचे अधिकारी राजेश जगताप, वाहनचालक सतिश जगताप, तांडेल राजेंद्र पायगुडे व जवान राजु भिलारे, विठ्ठल सावंत, महेश देशमुख, हेमत कांबळे, शुभम गोल्हर, प्रज्वल कसबे यांनी सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी बजावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.