Pimpri: पिंपरीत राष्ट्रवादीचे ‘मौन’ आंदोलन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. बेरोजगारी वाढली असून सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप करत त्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (मंगळवारी) महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधत राज्यभरात ‘मौन आंदोलन’ करण्यात येत आहे. पिंपरीत देखील राष्ट्रवादीचे मौन आंदोलन सकाळपासून सुरु आहे.

पिंपरी, खराळवाडी येथील पक्ष कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या मौन आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, कविता खराडे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका संगीता ताम्हाणे, माजी नगरसेविका शमीम पठाण, निलेश पांढारकर, राजेंद्र साळुंखे, विजय लोखंडे, आनंदा यादव आदी सहभागी झाले आहे.

आंदोलनस्थळी एक फलक लावण्यात आला असून त्यावर असत्य – राफेल विमान बनविण्याची एचएल कंपनीची क्षमता नाही. हिंसा – सनातन संस्थेवर बंदी कधी आणणार? आणि अशांती – कर्जमाफी घोषित केल्यानंतर शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या का ? या आत्महत्यांबद्दल कोणावर 302 कलम लावायचा? असा मजकूर लिहिला आहे.

शेती मालाला हमीभाव नाही, शेतक-यांची फसवी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, कामगार धोरण, महिला व युवतींवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती गुन्हेगारी आदी विषयात सरकार अपयशी झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचा या मौन आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करत असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.