गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

मावळात पंचायत समिती व पुणे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 74 टक्के मतदान

एमपीसी न्यूज – मावळ तालुका पंचायत समितीच्या दहा व पुणे जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी आज 74 टक्के मतदान झाले. मावळ तालुक्याचा दुर्गम भाग असलेल्या सावळा, माळेगाव बु., खांड,  इंगळून, साते या पाच गावांमधील मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान सुरू होते.

मावळ तालुक्यात 1 लाख 76 हजार 378 मतदारांपैकी 1 लाख 30 हजार 522 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 70 हजार 839 पुरुष व 59 हजार 683 महिला मतदारांचा समावेश आहे. आज सकाळी साडेसात वाजता मावळातील 216 मतदान केंद्रावर शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झाली. सकाळी पहिल्या दोन तासात साडेनऊ वाजेपर्यंत मतदानांचा वेग संथ राहिल्याने 9.65 टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या प्रत्येक दोन तासांच्या टप्प्यात सरासरी 15 टक्के मतदान झाल्याने दुपारी साडेतीनपर्यंत मावळात 55.78 टक्के मतदान झाले होते. किरकोळ वाद वगळत मावळात सर्वत्र शांततेमध्ये मतदान झाले. शिलाटणे गावात मतदान मशिनमध्ये बिघाड झाल्याने 45 मिनिटे मतदान बंद होते. तेवढा वेळ नंतर वाढवून देण्यात आला.

ग्रामीण भागात व ज्या गावातून उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत होत्या. संवेदनशील केंद्रावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मावळात 16 पोलीस अधिकारी 293 पोलीस कर्मचारी, 54 होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात आला होता. पोलीस ठाण्याचे अधिकारी हे मतदान केंद्रावर जातीने लक्ष ठेवून असल्याने कसलाही गैरप्रकार झाला नाही.

ग्रामीण भागाच्या तुलनेने शहरी भाग व दुर्गम भागात मतदानाचा वेग काहीसा कमी होता. वडगाव मात्र याला अपवाद ठरले. कार्ला व शिलाटणे या दोन गावांमध्ये आदर्श मतदान केंद्र बनविण्यात आले असून मतदान केंद्रावर मतदारांसाठी मंडप, पिण्याचे पाणी याची सोय करण्यात आली आहे. तसेच आकर्षक रांगोळी काढत मतदारांचे स्वागत करण्यात येत आहे. मतदान करणार्‍यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जात असल्याने मतदारांनी देखील आनंद व्यक्त केला. मावळच्या निवडणूक निरिक्षकांनी या केंद्रांना भेटी देत सोयीसुविधांची पाहणी केली.

मतदान आकडेवारी गणानुसार

27 टाकवे बु. वडेश्वर (टाकवे बु. गण) –  एकूण मतदान – 20068, झालेले मतदान – 15887, 79.17 टक्के

27 टाकवे बु. वडेश्वर –  (वडेश्वर गण) – एकूण मतदान 18538, झालेले मतदान 13964, 75.33 टक्के

28 इंदोरी-सोमाटणे (इंदोरी गण) – एकूण मतदान 12940, झालेले मतदान – 9332, 72.12 टक्के

28 इंदोरी- सोमाटे (सोमाटणे गण) – एकूण मतदान 18607, झालेले मतदान – 13895, 74.68 टक्के

29 वडगाव-खडकाळा (वडगाव गण) – एकूण मतदान 22128, झालेले मतदान 16550, 74.79 टक्के

29 वडगाव-खडकाळा (खडकाळा गण) – एकूण मतदान 15812, झालेले मतदान – 11405, 72.13 टक्के

30 वाकसाई- कुसगाव बु. (वाकसाई गण) – एकूण मतदान 17661, झालेले मतदान 12337, 69.85 टक्के

30 वाकसाई- कुसगाव बु (कुसगाव बु. गण) – एकूण मतदान 13217, झालेले मतदान 9483, 71.75 टक्के

31 महागाव-चांदखेड (महागांव गण) – एकूण मतदान 19940, झालेले मतदान 14078, 70.60 टक्के

31 महागाव – चांदखेड (चांदखेड गण) – एकूण मतदान 17467, झालेले मतदान 13591, 77.81 टक्के

Latest news
Related news