Pimpri : कारवाईच्या बडग्यानंतर वाहन चालकांना समजलंय वाहतूक नियमांचे महत्व

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, सिग्नल न पाळणे, भर रस्त्यात वाहने थांबविणे हे चित्र मागील कित्येक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत होते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात अफाट प्रगती केलेल्या या औद्योगिकनगरीला वाहतुकीच्या बाबतीत मात्र मोठे खेडे असेच म्हटले जायचे पण मागील दोन महिन्यांपासून वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालकांविरोधात सुरु केलेल्या कारवाई सत्रानंतर आता वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे मनावर घेतले आहे.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या संकल्पनेमुळे पोलीस, वाहतूक पोलीस चौकाचौकांमध्ये दिसत आहेत. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सिग्नल वगळता शहरातील बहुतांश भागातील सिग्नल हे केवळ बुजगावणे म्हणूनच लावण्यात आले होते. केवळ दिसण्यासाठी लावलेले सिग्नल आता कार्यरत झाले आहेत. त्या सिग्नलवर पूर्वी वाहने कुठेही पार्क केलेली पाहायला मिळत, मात्र आता पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून सुरळीत आणि शिस्तीत वाहतूक सुरु आहे. याचा वाहतूक पोलिसांना मोठा ताप झाला असला तरी त्यांच्याकडूनही यासाठी सकारात्मक प्रतिसाद येत आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर कारवाई करण्याबरोबरच शिस्तीचे धडे देखील दिले जात आहेत.

आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. तसेच मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते. बेशिस्त वाहतूक केल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी आणि त्यामागे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण अशा भयंकर समस्या निर्माण होतात. वाहतुकीच्या प्रत्येक नियमाचे पालन केल्यास वाहतूक कोंडीसारख्या वाहतुकीच्या समस्या येणार नाहीत. नो पार्किंग, रॉग साईड, नो एण्ट्री, ट्रिपल सीट, सिग्नल कटिंग अशा लहान लहान चुकांना सुधारून वाहतुकीला शिस्त लागणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-यांवर यापुढे देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे”

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-याला साडेसहा हजारांचा दंड

विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यामुळे हिंजवडी वाहतूक विभागाने एका वाहनचालकावर भारतीय दंड संहिता कलम 279 प्रमाणे गुन्हा दाखल केला. संजय महादेव बोरोले असे या वाहनचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी न्यायालयाने संजय यांना वेगवेगळ्या प्रकारचे तीन दंड मिळून तब्बल 6 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड संजय यांनी सोमवारी (दि. 1) न्यायालयात जमा केला.

आठ दिवसात 153 जणांवर गुन्हे 

वाहतूक विभागाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे देखील दाखल करण्याचे सत्र सुरु केले आहे. 1 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये 153 वाहन चालकांवर भारतीय दंड संहिता कलम 279 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या कलमान्वये विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास संबंधित वाहन चालकाला सहा महिन्यांपर्यंत कैद होऊ शकते. किंवा एक हजार रुपये दंड होऊ शकतो. किंवा वरील दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्याचबरोबर संबंधित वाहन चालकावर सरकार दप्तरी गुन्हेगार असा शिक्का बसतो. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मागील आठ दिवसात दाखल झालेले गुन्हे –

1 ऑक्टोबर – 29
2 ऑक्टोबर – 27
3 ऑक्टोबर – 12
4 ऑक्टोबर – 17
5 ऑक्टोबर – 17
6 ऑक्टोबर – 09
7 ऑक्टोबर – 14
8 ऑक्टोबर – 18

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.