Hinjawadi : विनयभंग प्रकरणानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात खांदेपालट

शिवाजी गवारे यांच्याकडे गुन्हे तर यशवंत गवारी यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद

एमपीसी न्यूज – विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास हयगय केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्यात आली आहे. विनयभंग प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनी संबधित सहाय्यक पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केली. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांना हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या जागी यशवंत गवारी यांची नियंत्रण कक्षातून हिंजवडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंजवडी येथे मुलींच्या वसतिगृहात अनोळखी मुलाने पहाटेच्या सुमारास येऊन एका तरुणीसोबत अश्लील चाळे केले. याप्रकरणी तरुणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता तिची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी तिला चार तास बसवून ठेवण्यात आले. तसेच पोलिसांनी तिच्याशी अरेरावीची भाषा केली. अशी तक्रार तरुणीने वकिलांच्या मध्यस्थीने पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडे केली.

आयुक्तांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली तातडीने नियंत्रण कक्षात केली. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 15 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या. त्यात शिवाजी गवारे यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरून हटवत त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातून यशवंत गवारी यांना पाठविण्यात आले. तर शिवाजी गवारे यांना हिंजवडी पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून नियुक्ती देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.