BNR-HDR-TOP-Mobile

Pune : राष्ट्रवादीचा विरोध डावलून स्थायी समितीची बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज -उरुळी – फुरसूंगी कचरा डेपो येथे एक हजार मेट्रिक टन क्षमतेचा बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम भूमी ग्रीन एनर्जी यांना 58 कोटी 14 लाख रुपयांना देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. काँग्रेसने सत्ताधारी भाजप बरोबर हातमिळवणी करत बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला. भूमी ग्रीन एनर्जी यांना कामाचा कोणताही अनुभव नसतानाही ‘अर्थ’पूर्ण चर्चेमुळे प्रति टन 646 या दराने चार वर्षासाठी हे काम देण्याची ‘किमया’ करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेने फुरूसंगी येथे कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत आणि जळावू इंधन तयार करण्यासाठी एक हजार मे.टन क्षमतेचा प्रकल्प उभारला होता. हंजर कंपनी हा प्रकल्प चालवित होती. परंतु 2015 मध्ये हा प्रकल्प बंद पडला. तत्पूर्वी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने कचरा डेपोलगतच दररोज कचरा डंप करण्यात येत होता.

आजमितीला याठिकाणी सुमारे 9 लाख मे.टन मिक्स कचरा आहे. एका याचिकेमध्ये हरित लवादाने महापालिकेवर ताशेरे ओढल्यानंतर पालिकेने या कचऱ्याची बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते. त्यानुसार उरुळी – फुरसूंगी कचरा डेपो येथे एक हजार मेट्रिक टन क्षमतेचा बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प उभारणे आणि दुरुस्ती करणे यासाठी पालिका प्रशासनाने निविदा काढली होती. त्यानुसार तीन निविदा आल्या. त्यात सर्वात कमी दराची निविदा भूमी ग्रीन एनर्जी यांची आली. त्यांना हे काम 58 कोटी 14 लाख रुपयांना देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला. प्रति टन 646 या दराने चार वर्षासाठी हे काम करुन घेतले जाणार आहे. त्यासाठीचा करारनामा करण्याचा प्रस्ताव आयुक्त सौरभ राव यांनी स्थायीपुढे ठेवला होता.

सौरभ राव यांनी सुमारे अर्धातास या प्रकल्पाची माहिती दिली. त्यानंतर बायोमायनिंग प्रकल्पाची निविदा काढताना यावर व्यवस्थित अभ्यास करून बी-1 पद्धतीने निविदा काढू शकत असतानाही मुद्दाम बी-2 पद्धतीने निविदा काढली.8 डिसेंबर 2015 रोजी भागीदारी करून भूमी ग्रीन ही कंपनी स्थापन झाली. त्यांच्या शॉप अॅक्ट परवान्यावर 21 एप्रिल 2016 ही तारीख आहे. त्यांनी वडगाव बुद्रुक येथे प्रत्येकी 50 मे.टन प्रती दिन व 100 मे.टन प्रती दिन असे दोन तसेच हडपसर येथे 200 मे. टन प्रती दिन इतक्या क्षमतेच्या प्रकल्पांवर काम केलेले आहे. 1000 मे. टन प्रती दिन क्षमतेचा त्यांना काहीही अनुभव नाही याकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य दिलीप बराटे यांनी लक्ष वेधले.

2016-17 या वर्षात 31 लाख रुपये, 2017-18 या वर्षात 3.70 कोटी व २०१८-१९ या वर्षात 8.92 कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या भूमी ग्रीन कंपनीला वर्षाला आता 58 कोटीचे काम देण्याची कृपा महापालिकेच्या घनकचरा विभागाने दाखवलेली आहे. एक लाख रुपयाची वार्षिक उलाढाल असलेली कंपनी दोन वर्षात 9 कोटी वार्षिक उलाढाल कुणाच्या आशीर्वादाने करते ? असाही सवाल उपस्थित करण्यात आला. बायोमायनिंगचा डीएसआर दर निश्चित करावा. बायोमायनिंग प्रकल्पाची निविदा बी-2 पद्धती ऐवजी बी-1 पद्धतीने काढावी अशी उपसूचना दिलीप बराटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दिली. पण भाजप आणि काँग्रेसने बहुमताच्या जोरावर ही उपसूचना फेटाळून बायोमायनिंगचे काम भूमी ग्रीन एनर्जी यांना देण्यास मान्यता दिली. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

.

HB_POST_END_FTR-A1
.