Pune : यंदा विजयादशमीला रावण दहन होणार नाही ?

रावण दहनाला भीम आर्मीचा विरोध

एमपीसी न्यूज- अनेक राज्यांमधील आदिवासी समाजात रावणाला दैवत मानले जाते. रावण दहनामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे पोलिसांनी रावण दहनाच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पुणे पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

भीम आर्मीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमधील आदिवासी समाजात रावणाला दैवत मानले जाते. तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये रावणाची मंदिरे देखील आहेत. रावण हा महान राजा होता. मात्र, इतिहासात रावणाची चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली. रावण हा खलनायक होता, हा दावाच चुकीचा आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या रावण दहनाच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात येऊ नये. रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी दिली तर संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

नाशिकमध्ये देखील आदिवासी बचाव अभियान व कोकणा कोकणी आदिवासी सेवा संघाने रावण दहनाच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. आदिवासी तसेच मागासवर्गीय समाजातील अनेकांसाठी रावण दैवत आहे. रावण दहनाच्या कार्यक्रमांमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. असे या संघटनांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.