Pune : ससून रुग्णालयाला ‘सृजन’च्या खेळाडूंकडून चार ‘सक्शन पंप’ भेट

एमपीसी न्यूज- ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाऱ्या स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि ‘सृजन’ संस्थेचे प्रमुख रोहित पवार यांच्या पुढाकारातून ‘सृजन क्रिकेट करंडका’च्या खेळाडूंमार्फत ससून रुग्णालयाला चार सक्शन पंप भेट देण्यात आले आहेत. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे नुकतेच हे सक्शन पंप सुपूर्त करण्यात आले.

यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू धीरज जाधव, रोहित पवार, ससूनचे उपअधिष्ठाता डॉ. संजय तांबे, कार्यालयीन अधीक्षक अजय तावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन भारती, मेटरन श्रीमती. गाडेकर, महाराष्ट्रातील टेनिस बॉलवरील नावाजलेले खेळाडू संदेश पार्टे, अफजल शेख, पप्पु ढवळे, विशाल कांबळे, आनंद चौहान, कुणाल खोंड, आनंद मोढवे, सुशांत जाधव, चेतन काळंगे, सचिन बर्गे, सागर शिंदे, सागर थरकुडे, राहुल कटके, बबलु पाटील, पप्पु तोडकर व एनसीपी क्रीडा विभागाचे पुणे शहर प्रमुख विपुल मैसूरकर, क्रीडाप्रेमी तेजस देवकाते व कुंडलिक बंडगर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

येत्या 30 ऑक्टोंबर पासून ते 16 डिसेंबर पर्यन्त पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह संपुर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सृजन क्रिकेट करंडकच्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. आजवर सहभागी झालेल्या खेळाडूंच्या उपस्थितीत सामाजिक जाणिव म्हणून ससून रुग्णालयास सक्शन पंपची भेट देण्यात आली.

“शहर व जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असणारे ’सक्शन पंप’ ससून रुग्णालयात आल्याने स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे” असे मत ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केले.

याबाबात रोहित पवार म्हणाले, “युवकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणं, संधी निर्माण करण हा सृजन व्यासपीठाचा मुख्य हेतू असला तरी आपण आपले सामाजिक कर्तव्य विसरता कामा नये. सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला सामाजिक जाणीव असते त्यास कृतीची जोड मिळावी म्हणून ससुन रुग्णालयात जाणवणाऱ्या अत्यावश्यक सेवामध्ये समाज म्हणून योगदान देता यावं म्हणून सृजन व्यासपीठामार्फत हा निर्णय घेण्यात आला. यापुर्वी असे उपक्रम सृजन मार्फत राबवण्यात आले असून भविष्यकाळात देखील सृजनचे खेळाडू सामाजिक उपक्रमांसाठी कटिबद्ध असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.