Pimpri: लोकसभेचे पडघम; आप्पा आणि भाऊ यांच्यात जुंपली !

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभेचे मैदान जवळ येताच एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी अशी ओळख असलेले मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे आणि भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

खासदार बारणे आणि आमदार जगताप हे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बारणे यांनी शिवसेनेकडून चिंचवड विधानसभेतून निवडणूक लढवित अपक्ष लढलेल्या जगताप यांना जोरदार टक्कर दिली होती. त्यात थोड्या मतांनी बारणे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीत जगताप यांनी बारणे यांना जंग-जंग पछाडले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बारणे यांनी विधानसभेच्या पराभवाचे उट्टे काढले. त्यांनी शेकापतर्फे लढलेल्या जगताप यांचा दीड लाख मताच्या फरकाने पराभव केला.

जगताप यांना लोकसभेच्या पराभवाचे उट्टे काढायचे आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपची युती होवो किंवा न होवो भाऊ मावळातून लोकसभा निवडणूक लढविणारच असल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. तर, दुसरीकडे बारणे यांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या साडेचार वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘संवाद खासदारांशी’ हा उपक्रम त्यांनी सुरु केला आहे. रविवारी (दि.21)आकुर्डीत झालेल्या या संवादात ‘ 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला मदत केली नाही का’? अशा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रामाणिक काम केले होते. त्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर सध्या पक्षात नव्याने आलेल्या काही इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी अतिक्रमण केले आहे’ असे उत्तर बारणे यांनी दिले होते.

त्याला आमदार लक्ष्मण जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘बारणे यांना मोदी लाटेत खासदारकीची लॉटरी लागली आहे. आता बारणे भाजपमध्ये दुही माजवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. भाजपबद्दल एवढेच प्रेम होते, तर त्यांनी गेल्या साडेचार वर्षांत भाजपच्या एका तरी कार्यकर्त्याला केंद्राच्या समितीवर किंवा इतर ठिकाणी संधी देणे गरजेचे होते’ असा पलटवार जगताप यांनी केला.

खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील त्वरित प्रत्युत्तर दिले. ‘2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातून पराभव होण्याच्या भीतीने मोदी लाटेवर स्वार झालेल्या व गेल्या चौदा वर्षात चौदा वेळाही विधानसभेत तोंड न उघलेल्या मौनी आमदार म्हणून ख्याती असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड शहराची पुरती वाट लावली आहे. राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेने भाजपाच्या हातात सत्ता दिली. परंतु, राष्ट्रवादीतून आलेल्यांच्याच हातात सत्ता आल्याने पुन्हा भ्रष्टाचारयुक्त अनागोंदी कारभार सुरु आहे. दीड वर्षातील या कारभाराला जनता कंटाळली असून जगतापांचा ताप पिंपरी-चिंचवडकरांना होतोय’

एकंदरीतच लोकसभेची निवडणूक जशी जवळ येईल तसा खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात कलगीतुरा रंगणार असल्याचीच ही चिन्हे असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.