Wakad : पोलीस करणार मल्टीपर्पज ड्युटी – आर के पद्मनाभन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर विविध शाखा आणि विभाग सुरु करण्यात आले आहेत. पण मनुष्यबळाची कमतरता आयुक्तालयला पावलोपावली जाणवत आहे. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळाच्या जोरावर आयुक्तालयाचा कारभार सुरू आहे. वाढत्या कामाचा व्याप आवरण्यासाठी एक पोलीस एका वेळी अनेक कामे करणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक विभाग नियंत्रण कक्षाचे उदघाटन पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उदघाटनासाठी उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त नम्रता पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त म्हणाले, “नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयुक्तालयांतर्गत फिरती तक्रार पेटी ठेवण्यात येत आहे. एखाद्या ठिकाणी ती पेटी साधारणतः दोन दिवस ठेवण्यात येईल. त्यानंतर ती पेटी पोलीस ठाण्यात आणून उघडण्यात येईल. त्यातील तक्रारींवर तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल. या पेटीमध्ये तक्रार टाकताना निनावी तक्रार दिली तरी चालणार आहे. निनावी तक्रारींची देखील पोलिसांकडून दखल घेण्यात येईल. एखादा पोलीस तपासासाठी बाहेर पडला तर तो संबंधित सोसायटी, शाळा -महाविद्यालयात जाऊन तक्रार पेटी घेऊन येईल. त्याच वेळी त्या भागातील आरोपीला समन्स बजावेल. यामुळे पोलिसांचा वेळ वाचेल. तो वेळ अन्य कामांसाठी वापरता येईल”

“वाहतूक नियमन आणि कायदा व सुव्यवस्था या दोन्ही गोष्टी पोलीस करणार आहेत. एखादा पोलीस चौकातून जात असताना वाहतुकीला अडथळा येत असेल तर त्या चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी थांबेल. आता कोणताही पोलीस हे माझे काम नाही, असे कारण सांगणार नाही. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना दंड भरण्याचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वाहन चालकाने दंड भरण्यास नकार दिला तर त्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे” असेही आयुक्त म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.