Pimpri : दिवाळीच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी, आकर्षक दिवे, पणत्या बाजारात दाखल

एमपीसी न्यूज – दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, प्रकाशाचा झगमगाट. घराच्या दारापाशी, तुळशीजवळ लावण्यात येणा-या दिव्यांमुळे शहरात मंगलमय वातावरणाची प्रचिती येते. दिवाळीच्या निमित्तानं बाजारात विविध डिझाईन, रंगसंगती, आकार, यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहे.

दिवाळीशी अतूट नाते असणारे हे दिवे बाजारात दाखल झाले आहेत. छोटय़ाशा, नाजूक, रंगीबेरंगी पणत्यांमुळे दीपोत्सव पूर्ण होऊच शकत नाही. चकाकणारी चमकी, टिकल्या, घुंगरू, काच आदी सजावटींच्या वस्तू वापरत बनवलेल्या ट्रेन्डी, डिझायनर पणत्या बाजारात दिसत आहेत. प्लास्टिकच्या आकारातील दिवे आणि त्यावर पिवळी लायटिंग असणाऱ्या चायनीज दिव्यांच्या माळेलाही तितकीच पसंती आहे. दिवाळीत भरघोस मागणी असलेल्या या पणत्यांचे रुपडे गेल्या काही वर्षात बदलत चालले आहे. पण पारंपरिक पणत्यांची आवड तीळमात्रही कमी झालेली नाही. पारंपरिक पणत्या लाल मातीपासून तयार केल्या जातात. चिनी माती, प्लास्टर ऑफ पॅरिस यांचा वापर करत बनवलेल्या पणत्याही बाजारात दाखल झाल्या आहेत.

कोयरी, चौकोनी, गोलागार, षटकोनी, पान, मोर, हत्ती, बदाम, फुलं, कमळ, तुळशी वृंदावन अशा विविध आकारांतील आकर्षक पणत्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत. मातीच्या पणत्यांमधून तेल गळते. त्यामुळे रांगोळीच्या जवळपास, जमिनीवर तेलाचे डाग पडतात. या कारणाने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या पणत्यांना अनेक जण पसंती देत असल्याचे दिवे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

बाजारात 10 रुपयांपासून ते 250-300 रुपयांपर्यंत आणि त्याहून महाग दिवे आहेत. लाल मातीचे साधे, छोटे दिवे आधी 5 रुपयांपर्यंत मिळायचे. आता एका दिव्याची किंमत 10 रु. झाली आहे. रंगरंगोटी केलेले; पण साधे दिवे प्रति 20 रु. आहेत. काच, चकमकी, मणी आदी सजावटीचे साहित्य वापरत बनवलेल्या दिव्यांची किंमत 50 रुपयांपासून सुरू होत 100 रुपयांपर्यंत आहेत.

कोयरी, मोर, बदाम अशा विविध आकारातील दिवे 70 ते 80 रुपयांपर्यंत मिळतात. आकाराने मोठय़ा आणि भरगच्च सजावट केलेले दिवे 100 रुपयांपर्यंत आहेत. छोटे मेणाचे 12 दिव्यांचे पाकीट 20-30 रुपयांपर्यंत आहे. विजेवर चालणा-या दिव्यांच्या माळेची किंमत 150 रुपयांपासून सुरू होते. विविध ठिकाणी वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळ्यां उपलब्ध झाल्या असून 10 रुपयांपासून 50 रुपयांच्या रांगोळ्यांची पाकीटे विकली जात आहेत. त्याशिवाय धकाधकीच्या जीवनात रांगोळी काढण्यासाठी वेळ न मिळणाऱ्या गृहिणींसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे रांगोळ्यांचे साचे, रेडिमेड रांगोळ्याही उपलब्ध झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.