Vadgaon Maval : पीएमआरडीएचे दुसरे क्षेत्रीय कार्यालय मावळ तालुक्यात सुरु

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण व नियोजनबद्ध विकासासाठी येथील मावळ पंचायत समितीच्या आवारात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयाचे उदघाटन सोमवारी (दि.२९) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय भेगडे, पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते, पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, उपजिल्हाधिकारी सुहास मापारी, अधीक्षक अभियंता मिलिंद बोगाळे, कार्यकारी अभियंता भरत कुमार बाविस्कर, प्रांताधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार रणजित देसाई, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, दिनेश ढोरे, अनंता कुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले “, पुणे विभागाच्या विकासासाठी पीएमआरडीए आहे. भविष्यात तिसरी मुंबई व्हायची असेल तर तळेगाव हा केंद्र बिंदू आहे. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पीएमआरडीएच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. पीएमारडीएच्या माध्यमातून सर्वात तीन मोठे रस्ते जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. नागरिकांना कामकाज सोईचे पडेल अशा दृष्टीने हे कार्यालय सुरु केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी आम्ही समर्थ आहे. बोगस रेशनकार्ड रद्द करुन स्वस्त धान्य दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहे. स्वस्त धान्य दुकानदार उपाशी राहणार नाही याची व्यवस्था केली आहे. डीबीटी पद्धत प्रायोगिक असून तिचा धसका घेऊ नका. मावळ तालुक्याचे विशेष महत्त्व असून इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी पीएमआरडीए महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

आमदार संजय भेगडे म्हणाले, ” पीएमआरडीएच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला गती मिळणार आहे. जांभूळ, सांगवी, कातवी, नवलाख उंब्रे, करंजविरे १ मार्ग, कोथुर्णे ते मळवंडी ठुले व सोमटणे फाटा ते तळेगाव दाभाडे हे १० किलोमीटरच्या रस्त्यांचे कामकाज पीएमआरडीएच्या माध्यमातून हाती घेतले जाणार आहे. तसेच अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे काम या स्थानिक कार्यालयातून होणार असल्याने आम्हांला दिलासा मिळाला आहे

प्रास्ताविकात महानगर आयुक्त किरण गित्ते म्हणाले, “पुणे व पिंपरी-चिंचवडचा मोठ्या प्रमाणात विकास होत असताना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पीएमारडीएची स्थापना झाली आहे. नागरिकांना सर्व कामकाज सोईच्या दृष्टीने व्हावे याकरिता चार कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.मावळ व खेड तालुक्यासाठी बांधकाम परवानगी व झोन दाखला, अनधिकृत बांधकाम तक्रारी निवारण, यासारख्या अनेक कामकाजासाठी पीएमारडीएच्या औंध कार्यालयात जावे लागणार नाही. सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायती सोबत राहून पीएमारडीए काम करणार आहे. नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. या उद्देशाने वडगाव मावळ येथील प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले आहे ग्रामीण भागाच्या कनेक्टिव्हिटीसाठी पीएमारडीएचे दुसरे वडगाव मावळ कार्यालय कार्यान्वित झाले आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवींद्र म्हाळसकर यांनी केले. आभार उपसभापती शांताराम कदम यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.