Pune : पाणीपुरवठा वेळापत्रकाचा उडाला बोजवारा ;पाण्यावाचून शहरवासी त्रस्त

एमपीसी न्यूज – ऐन दिवाळीच्या तोंडावरच शहरात रोज एकवेळ पाच तास पाणीपुरवठा करणाऱ्या वेळापत्रकाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला. त्यामुळे शहरातील अनेक भागात जाहीर केलेल्या वेळेनुसार पाणी आले नाही. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वेळापत्रकात बदल करण्याची नामुष्की आता पालिका प्रशासनावर आली आहे.

शहरात कालवा फुटी आणि महापालिकेचे पाणीपुरवठयाचे पंप बंद केल्यानंतर तक्रारींमध्ये वाढ झाली होती. शहराच्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी लक्षात घेता. समान पाणीपुरवठा करण्यासाठी झोनमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता सर्व भागात रोज एक वेळ पाणी सोडण्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरु झाली. पण या वेळापत्रकाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला.

हडपसर, बिबवेवाडी, पर्वतीदर्शन, मुळा रोड, गुजरात कॉलनी या भागातील नागरिकांना जाहीर केलेल्या वेळेत पाणी मिळाले नाही. हडपसर आणि लोहगावमध्ये चार दिवसांपासून पाणी नाही. बिबवेवाडी मधील नागरिक सोमवारी पाणी नक्की मिळेल म्हणून वाट पहात होते. त्यांच्याकडे पाणी आलेच नाही. पर्वतीदर्शन तसेच पद्मावती या भागातील सोसायट्यांमध्ये पाणी आले मात्र त्याला काही प्रेशरच नव्हते. त्यामुळे त्यांच्या टाक्या भरल्याच नाहीत.

पाणीपुरवठयाच्या वेळा बदलल्यामुळे शहराच्या विविध भागांमधील कुटुंबांमध्ये आता त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. नेमके पाणी येण्याच्या वेळेस घरात कोणीच नसेल अशा कुटुंबाची अडचण होत आहे. काही भागांमध्ये पाणी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आले. शहराच्या मध्यभागातीस पेठांमध्ये त्याचे प्रमाण मोठे आहे. फक्त एकवेळ पाणी येणार असल्यामुळे आता त्यांना सकाळी आले तर संध्याकाळी नाही व संध्याकाळी मिळाले तर सकाळी नाही याची सवय करावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.