Pune …अन्यथा आयुक्तांच्या घरासमोर करणार आंदोलन ; विरोधीपक्ष नेत्यांचा इशारा

एमपीसी न्यूज- ऐन दिवाळीच्या तोंडावरच शहरात रोज एक वेळ पाच तास पाणी पुरवठा करणाऱ्या वेळापत्रकाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला. त्यामुळे शहरातील अनेक भागात जाहीर केलेल्या वेळेनुसार पाणी आले नाही. हडपसर भागात तर चार दिवस पाणी येत नाही. त्यामुळे आता आयुक्त सौरभ राव यांच्या घरासमोर पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी दिला आहे. त्यामुळे आता महापौर बंगल्यानंतर आयुक्तांच्या घरासमोर देखील घशाला कोरड पडलेल्या पुणेकरांचे रिकामे हंडे धडकणार असेच दिसत आहे.

शहराचा पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी वेळापत्रकात बदल करण्याची नामुष्की आता पालिका प्रशासनावर आली आहे. अशातच हडपसर भागात तर चार दिवस पाणी येत नाही. रविवारी (दि. २८) महापौर बंगल्यावर आयुक्त, महापौर, खासदार आणि नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये पाणीकपाती संदर्भात बैठक सुरु असताना पुणेकरांनी थेट महापौर बंगल्यावरच धडक मारली होती. त्यानंतर आता विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी आयुक्तांनाच थेट इशारा दिला आहे.

शहरात कालवा फुटी आणि महापालिकेचे पाणी पुरवठयाचे पंप बंद केल्यानंतर तक्रारींमध्ये वाढ झाली होती. शहराच्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी लक्षात घेता. समान पाणीपुरवठा करण्यासाठी झोनमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता सर्व भागात रोज एक वेळ पाणी सोडण्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरु झाली. पण या वेळापत्रकाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.