Chakan : रेकॉल्ड कंपनीला टाळे; सुट्टी देऊन रात्रीतून हलवली यंत्रसामुग्री

ऐन दिवाळीत कामगार कुटुंब देशोधडीला

एमपीसी न्यूज- चाकण औद्योगिक वसाहतीतील वॉटर हिटर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य व नामांकित असलेल्या रेकॉल्ड थर्मो या कंपनीतील कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता व्यवस्थापनाने ऐन दिवाळीत कंपनी अचानक बंद केली आहे. यामुळे सुमारे शंभर कायम कामगारांची आणि अनेक अस्थायी कामगारांची कुटुंबे देशोधडीला लागली आहेत.

या कंपनीतील कामगार आणि कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार चाकण औद्योगीक क्षेत्रात वॉटर हिटर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य व नामांकित असलेली रेकॉल्ड थर्मो. प्रा. लि . गेल्या 21 वर्षापासून उत्तम प्रकारे व्यवसाय करीत आहे. भारतीय व आंतरराष्ट्रीय बाजारात कंपनीच्या सर्व उत्पादनांना प्रचंड मागणी असल्याने कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चालू वेतन करारामध्ये कंपनीच्या प्रगती करीता कामगारांनी 35 टक्के एवढी भरघोस उत्पादन वाढ देण्याचे मान्य केले.

मात्र कंपनीच्या भारतीय व्यवस्थापन प्रतिनिधींनी कामगार विरोधी भूमिका घेत मागील काही वर्षात कंपनीतील उत्पादनाचे काम क्रमाक्रमाने कंपनी बाहेर नेले. राज्याच्या अन्य भागात व इतर राज्यातून हेच उत्पादन तयार करण्यास सुरवात केली . या बाबत कामगार संघटनेने व्यवस्थापनाला वेळोवेळी पत्र व्यवहार केला . मात्र चाकण मधील कामगारांना पुरेल एवढे काम व वेतन कंपनी तुम्हाला देत राहील अशी शाश्वती व्यवस्थापनाने दिली. मात्र उत्पादनाचे आऊटसोर्सिग करण्याचे धोरण कायम ठेवले .

त्यामुळे कामगारात त्यांच्या रोजगाराविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण होवून कामगारांनी आपला कायम स्वरूपी रोजगार अबाधित रहावा या करिता 2016 मध्येच पुण्याच्या कामगार आयुक्त कार्यालयात दाद मागण्याकरिता प्रकरण दाखल केले होते . हा विषय न्यायप्रविष्ट असताना कंपनी व्यवस्थापनाने तांत्रिक कामाच्या नावाखाली सर्व कामगारांना मागील आठवड्यात सलग तीन दिवस पगारी सुट्टी देऊन कंपनीतील साहित्य रात्रीतुन बाहेर हलविले. त्यानंतर गुरुवारी (दि.1 नोव्हेंबर) सर्व कायम कामगारांना बडतर्फीचे पत्र त्यांचे घरी पाठविले. कंपनीचे उत्पादने व मशिन कालबाहय झाल्याचे व कंपनी तोट्यात असल्याचे कारण देत कंपनी बंद करीत असल्याचे कामगारांना कळविले. या अनपेक्षित कोसळलेल्या संकटामुळे सर्व 97 कायम कामगार आणि शेकडो अस्थायी कामगार व त्यांचे कुटुंबिय रस्त्यावर आले आहेत.

ही बातमी वा-यासारखी कामगारांत परिसरात पसरली आणि कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारावर जमा झाले. येथील वातावरण तणावग्रस्त असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु :

रेकॉल्डच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप दगडे, सरचिटणीस स्वप्नील बारमुख, उपाध्यक्ष संतोष घुले, सतीश येडे यांनी सांगितले कि, कंपनीने तीन दिवसांची सुटी दिल्यानंतर अचानक बडतर्फीची पत्रे घरी आली. त्यानंतर कामगारांना कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे लावल्याचे निदर्शनास आले. ज्या कामगारांनी गेली वीस वर्षे आपला घाम गाळून कंपनीच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिलेले आहे, आज त्याच कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर ऐन दिवाळीच्या तोंडावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे कामगारांनी त्यांच्या कुटूबियांसह आपल्या न्याय्य हक्कासाठी कंपनीचे गेट समोर तीव्र आंदोलन सुरु केले आहे. चाकण आणि पिपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांनी या लढ्यास सहयोग दयावा असे आवाहन रेकॉल्ड कंपनीतील कामगारांनी केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.