Pimpri: आंद्रा धरणातील पाणी आरक्षणात दोन एमएलडीने घट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसाठी आंद्रा धरणातून पिण्याचे पाणी देण्यासाठी ठेवलेल्या आरक्षणात जलसंपदा विभागाने अचानक दोन एमएलडीने घट केली आहे. त्यामुळे आंद्राधरणातून 38.87 ऐवजी आता 36.87 एमलडी पाणी शहरासाठी आरक्षित असणार आहे. जलसंपदा विभागाने याबाबतचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिका दररोज 480 एमएलडी पाणी धरणातून घेते. शहराची वाढती लोकसंख्या आणि सद्यस्थितीत पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात शहरातील नागरिकांची तहान भागविणे अशक्‍य आहे. त्यामुळे आंद्रा आणि भामा आसखेड धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड शहरासाठी आरक्षित ठेवले होते.

तथापि, भामा-आसखेड व आंद्रा धरणातील पाण्याचे आरक्षण मंजूर झाल्यानंतर महापालिकेने कुठलाही करारनामा जलसंपदा विभागाशी केला नाही. तसेच पाण्याच्या आरक्षित ठेवलेल्या सिंचन पुर्नस्थापन रक्कम 238.53 कोटी रुपये भरली नव्हती. त्यामुळे पुणे पाटबंधारे मंडळाने 27 जुलै 2017 रोजी आरक्षण रद्द केले होते.

त्यानंतर महापालिकेने आरक्षणाचा फेरप्रस्ताव सादर केला. याबाबतचा प्रस्तावाला राज्य सरकारच्या मंत्री उपसमितीने 24 आॅक्टोबर रोजी मुदतवाढ दिली. त्यानुसार पवना धरणातील 48.576 दलघमी, आंद्राधरणातून 38.87 आणि भामा आसखेड धरणातून 60.79 दलघमी पाणी शहरासाठी आरक्षित केले होते.

त्यानंतर पाण्यापोटी शासनास सिंचन पुर्नस्थापना खर्चाचा राज्य सरकारला पहिला हप्ता देण्यासाठी 45 कोटी रुपयांस महासभेने मान्यता दिली. परंतु,
दोन आठवड्यांनंतर जलसंपदा विभागाने अचानक आंद्रा धरणातील पाणी आरक्षणात दोन एमलडीने कपात केली आहे. त्यामुळे आंद्राधरणातून 38.87 ऐवजी 36.87 एमलडी पाणी शहरासाठी आरक्षित असणार आहे. याबदलाचे जलसंपदा विभागाचे उपसचिव अ. अ. कपोले यांनी शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.