Pimpri: पृथ्वीला वाचविण्यासाठी झाडे लावा अन्‌ पुण्य मिळवा – वनमंत्री मुनगंटीवार

 

एमपीसी न्यूज – देशासमोर वसुंधरेला वाचविण्याचा आज मोठा प्रश्न आहे. सन 2050 पर्यंत पृथ्वीला पेट्रोल, डिझेल, कोळसामुक्त नाही केल्यास पृथ्वीला आपण वाचवू शकत नाही. असे पर्यावरण प्रेमी, राज्यकर्ते म्हणत आहेत. पृथ्वीला कोळसा मुक्त करण्याचे काम झाडेच करु शकतात. परंतु नागरिक वसुंधरेला वाचविण्याऐवजी बाधा पोहचविण्याचे काम करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. देवाने पुण्य देण्याचा ‘जीआर’ बदलला आहे. जो झाडे लावेल त्यालाच देव पुण्य देईल. त्यामुळे सर्वांनी झाडे लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पिंपरीतील एच. ए मैदानावर असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट हॉर्टीकल्चरतर्फे 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय फुलांच्या प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन आज (गुरुवारी) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे विकास खारगे, असोसिएशनचे अध्यक्ष संतोष शिदोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष विश्वास जोगदंड, सचिव अनिल अंबेकर, हेमंत कापसे आदी उपस्थित होते.

देशासमोर वसुंधरेला वाचविण्याचा आज मोठा प्रश्न आहे. वसुंधरा मानवाला ऑक्सीजन, प्राण वायू देत आहे. त्यामुळे 200 रुपयांचे झाड लावण्याचे नागरिकांचे कर्तव्य आहे असे सांगत मुनगंटीवार म्हणाले, “या पृथ्वीला वन्यप्राणी, पक्षी, पक्षु यांनी वाचविले आहे. मनुष्याने वसुंधरेला वाचविण्याऐवजी धोके देण्याचे काम केले आहे. पृथ्वीला कोळसा मुक्त करण्याचे काम केवळ झाडेच करु शकतात. त्यासाठी पृथ्वीला वाचविण्यासाठी झाडे लावण्याचा संकल्प केला पाहिजे. अगरबत्तीच्या लाकूड देखील आपल्याला आयात करावे लागत आहे. ‘भारत माता की जय’ म्हणत आहोत. तर अगरबत्तीची काडी तरी आपण बनविली पाहिजे. सरकारने वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. बांबू लागवडीचे क्षेत्र वाढविले आहे. बांबूपासून इथेनॉल बनविण्यात येणार आहे.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, “वसुंधरेला सुंदर करण्याचे काम सर्वांचे आहे. त्यामध्ये प्रत्येकाचे योगदान असणे आवश्यक आहे. प्राण वायूला दुसरा पर्याय नाही. पृथ्वीने गेले 70 वर्ष लक्ष मनुष्याला प्राण वायू दिला. ज्या वसुंधरा मातेने जिवनात आनंद फुलविला. त्या वसुंधरेला हिरवेगार ठेवण्याची नागरिकांची जबाबदारी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या भूमीतूनच वन, वृक्षाचे संवर्धन कशापद्धतीने करावे याचे मार्गदर्शन जगाने घेतले आहे. वन क्षेत्रात काम करणा-यांना उर्जा देण्याचे काम हे फुलांचे प्रदर्शन करेल. देशात अनेक समस्या, प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचे समाधान करण्याचे काम हे प्रदर्शन करणार आहे. मी वनमंत्री आणि धनमंत्री आहे. वित्त आणि चित्त हे माझ्यापाशी आहे. कृषीमंत्र्यांसोबत चर्चा करुन नर्सरीवाल्यांसाठी आणखीन काम केले जाईल. वन आणि कृषी क्षेत्राने जास्त रोजगार दिले आहेत. पृथ्वीच्या संवर्धनासाठी काम करणा-यांच्या सरकार पाठिशी आहे. ‘आप आज आगे बढो सरकार आपके साथ है’ असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.