Pune : दोन लाखांची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षकासह हवालदाराला रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये फरार घोषित केलेल्या आरोपींना गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस निरीक्षकासह एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. काल, गुरुवारी (दि. 15) रात्री स्वारगेट मित्रमंडळ चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली.

राजेश सदाशिव शिरसाठ (वय 48 पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण), संजीव खंडेराव आहेर(वय 48, पोलीस हवालदार, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण ), असे लाच स्वीकारणाऱ्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार व त्यांचे साथीदार यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या साथीदारांविरुद्ध प्रोक्लेमेशन (फरार घोषित केले आहे) काढलेले आहेत. या प्रोक्लेमेशनमध्ये अटक करण्याची तक्रारदारास धमकी देऊन या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे 2 लाखांची लाच मागितली.

तक्रारदाराने पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली असता. या तक्रारीची पडताळणी करून पुणे लाचलुचपत विभागाने गुरुवारी रात्री स्वारगेट मित्रमंडळ चौकात सापळा रचून २ लाखांची लाच स्वीकारताना पकडले. ही कामगिरी लाचलुचुत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस उपअधीक्षक प्रतिभा शेंडगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.