Pune : सुपर आय केअर हॉस्पिटलचे शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन

पुणे महापालिका आणि व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

एमपीसी न्यूज- पुणे महानगर पालिका आणि व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन यांच्या वतीने बोपोडी येथे उभारण्यात आलेल्या दत्तात्रेय वळसे सुपर स्पेशालिटी आय केअर या डोळ्यांच्या हॉस्पिटलचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे संचालक डॉ. अंबरीश दरक, डॉ. सुरेंद्र पाटील, बनी दालमिया, विद्यासागर हिरमुखे तसेच श्रीकांत पाटील, उमेश चांदगुडे आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी येथील वैद्यकीय उपकरणे, तसेच नवीन तंत्रज्ञान व सुविधांची पाहणी केली.

यावेळी बोलताना बापट म्हणाले, ” पुणे शहरात नवनवीन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यामुळे पुण्याचा झपाट्याने विकास होत आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळतील”.

डॉ. अंबरीश दरक म्हणाले, ” सर्वसामान्य माणसाला डोळ्यांशी निगडीत सर्व प्रकारच्या सोयी अगदी माफक दरात उपलब्ध व्हाव्यात हा एकमेव उद्देश ह्यामागे आहे. इतकच नाही तर दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी या सर्व सुविधा मोफत असणार आहेत. ज्येष्ठ व्यक्तींनी देखील त्यांना जाणवणाऱ्या डोळ्याच्या तक्रारी बोलून दाखवल्या पाहिजेत. जेणेकरून डोळ्याच्या तक्रारी गंभीर स्वरूप धारण करणार नाहीत”. या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. दरक यांनी केले. शहर व शहराबाहेरील नेत्रविकारानी त्रस्त असलेल्या रुग्णांना या हॉस्पिटलमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like