BNR-HDR-TOP-Mobile

एक पावसाची रात्र – थरारक अनुभव

261
PST-BNR-FTR-ALL

(जयंत रिसबूड)

एमपीसी न्यूज- आजपर्यंत मी अनेक किल्ले केले, बऱ्याच ट्रेकरूटवर भटकंती केली. पण काही मोजक्याच ट्रेकच्या आठवणी अजून मनात रेंगाळतात, कारण त्या ट्रेकचा थरारक अनुभव, त्या त्या किल्ल्यांचा इतिहास, काही किल्ल्यांची वैशिट्यपूर्ण चढाई, इत्यादी. यापैकी एका ट्रेकच्या आठवणी कायमच स्मरणात राहतील. व तो ट्रेक म्हणजे लोणावळा ते भीमाशंकर.

ही गोष्ट आहे बारा वर्षांपूर्वीची. नक्की तारीख सांगायची झाली तर 13 ऑगस्ट, 2006. आमची संस्था गिरिकुजनच्या ऑगस्ट 2006 महिन्याची कार्यक्रम पत्रिका हातात पडली. ऑगस्ट 13 ते 15 ता कालावधीसाठी लोणावळा ते भीमाशंकर हा ट्रेक ठरला होता. मी लगेच नांव नोंदविले.

दिवस पहिला – 13 ऑगस्ट, 2006 : लोणावळा ते वळवंड – अंतर सुमारे 18 किलोमीटर

मुकुंदराव देशपांडे, सुधीर जाधव, पुरुषोत्तम सावंत, सतीश कोंडरा, बापू सोनावणे, विनायक ढमढेरे, निलेश शेडगे व मी असे आठ जण मुकुंदराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी चारच्या लोकलने लोणावळ्याला जाण्यासाठी निघालो. ऑगस्ट महिना म्हणजे पावसाळा. पुण्यात पाऊस नव्हता पण कामशेतला भूर भूर पाऊस सुरु झाला. जेंव्हा लोणावळ्याला पोहोचलो तेंव्हा तर धुवाधार पाऊस सुरु झाला. स्टेशनवर उतरलो व एका टपरीवर आम्ही सर्वांनी चहा घेतला रेनकोटचे ओझे नको म्हणून मी माझ्या मित्राचा विंड चीटर घेतला होता. विंड चीटर म्हणजे वाऱ्यापासून संरक्षण. त्याचा पावसात काही उपयोग नसतो कारण तो वॉटर प्रूफ नसतो. हा माझा निर्णय किती चुकीचा होता ह्याचा प्रत्यय लगेचच आला.

सातचा सुमार होता. चहा पिऊन तुंगार्ली लेक मार्गे राजमाचीच्या वाटेल लागलो. वरून धुवाधार पाऊस पडतच होता. अंधार झाला म्हणून आम्ही आमचे टॉर्च काढले. मजल दरमजल करत पुढे निघालो. वाटेत एक दुथडीभरून वाहणारा ओढा लागला. ओढ्यात पाऊल टाकले. पाण्याला इतकी ओढ होती कीं, पाय पाण्यात ठरतच नव्हता. मग आम्ही मानवी साखळी करत तो ओढा ओलांडला. पहिलाच अनुभव असल्यामुळे मी खूप घाबरलो होतो. पण नंतरच्या दोन दिवसात इतके असे दुथडी भरून व रोरावणारे ओढे आम्ही मानवी साखळी करून ओलांडले की भीती थोडी कमी झाली. पुढे तर मी ओढे मोजायचेच सोडले.

आमच्या पहिल्या मुक्कामाचे ठिकाण होते वळवंड गांव. आम्हा आठ जणांची पदयात्रा चालूच होती.. वरून पाऊस आपला सुरूच. आमच्या पावलाचा पचक पचक आवाज येत होता. त्यामुळे शांततेचा भंग होत होता. अधून मधून गप्पा होत होत्या. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आम्ही वळवंडला पोहोचलो. आता पाऊस थोडा कमी झाला होता. साधारणतः ट्रेक मध्ये खेड्यात आमच्या मुक्कामाचे ठिकाण हे त्या गांवची शाळा अथवा मंदिर किंवा कोणाचीतरी पडवी. आमचा मुक्कामाच्या ठिकाणाचा शोध सुरु झाला. गावातले सर्व लोक चुडीचुप्प झोपले होते. आम्हाला शाळेची इमारत दिसली. व निश्वास सोडला. सुदैवाने एक खोली उघडी होती.

खोलीत पाऊल टाकले व आमच्या आनंदावर विरजण पडले. खोलीच्या निम्म्या भागावर पत्रे होते व निम्म्या भागावरचे पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले होते. पत्रे असलेल्या भागात आमची पथारी टाकली. ओले झालेले कपडे अधिक भिजण्यासाठी वाळत घातले. बरोबर आणलेले प्लास्टिक बॅगमध्ये पॅक केलेले कोरडे कपडे चढवले. जवळच्या मेणबत्या पेटवल्या पोटात कावळे कोकलत होते. बरोबर आणलेले जेवण गप्पा मारत संपविले. खूप दमलेले होतो त्यामुळे कधी झोप लागली ते कळले नाही. उघड्या छतातून पाऊस पडतच होता व ते पाणी आमच्या कॅरीमॅटवर येतच होते.

दिवस दुसरा – 14 ऑगस्ट, 2006 : वळवंड ते कुसूर – अंतर अंदाजे 18 किलोमीटर

आम्ही सर्व सकाळी पाच वाजता उठलो. झोप झाल्यामुळे ताजेतवाने वाटत होते. सर्व उरकून व बरोबर आणलेला नाश्ता संपविला, कोरडे कपडे काढून वाळत घातलेले व अधिकच गार पडलेले कपडे चढवताना अक्षरशः नको नको वाटत होते. हीच कवायत आम्ही पुढील दोन दिवस करत होतो.

आता आमचा पुढचा टप्पा होता सावळे गांव, अंतर सुमारे 24 किलोमीटर. आमचा मार्ग हा ढाकच्या बहिरी जवळून कुसूरचे पठार, कुसूरगांव व शेवटी सावळे गावी मुक्काम असा होता. पाऊस तर आमच्या सोबतीला होताच. वाटेत कुंडेश्वराचे मंदिर दिसले. आम्ही ढाकच्या दरीत सकाळी 11 वाजता उतरलो व कुसूरच्या पठाराची वाट शोधू लागलो. पण वाट सापडता सापडेना. सर्व दिशांना शोध मोहीम सुरु केली पण जैसे थे. यात तीन तास गेले. दुपारचे दोन, अडीच वाजले होते. सर्व जण निराश झालो होतो. आपला ट्रेक होणार नाही असेच वाटू लागले. आम्ही सर्वजण एका जागेवर जमलो व असा निर्णय घेतला कि आता पुढे जाण्यात अर्थ नाही. जवळच्या जांभूळगावला जायचे, एसटीने कामशेतला जाऊन लोकलने पुण्याला परतायचे.

असे ठरवून आम्ही दरी चढायला सुरुवात केली. आम्ही सर्व निराश झालो होतो. परतीचा मार्ग धरला. पण म्हणतात ना की तीव्र इच्छा असली तर मार्ग सापडतो. कारण एका दगडावर आम्हाला B.S. अशी अक्षरे दिसली व एक बाण रंगवलेला दिसला. आम्ही सर्वानी एकच जल्लोष केला. असा आशा निराशेचा खेळ पुढचे दोन दिवस सतत चालणार होता. त्या वेळेला संध्याकाळचे चार वाजले होते. लवकरच आम्ही कुसूर पठारावर पोहोचलो. माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूरजवळील मसाईचे पठार व लोणावळ्या जवळचे कुसूरचे पठार ही दोनच विस्तीर्ण अशी पठारे आहेत. दोन्ही पठारे ही क्षेत्रफळाने खूप मोठी आहेत. कुसूरचे पठार ओलांडायला आम्हाला दोन तास लागले. वाटेत एक धनगरवाडा लागला. पाऊस सोबतीला होताच. उतरण खूपच निसरडी होती. काळजीपूर्वक उतरावे लागत होते.

कुसूर गावात आम्ही सात वाजता पोहोचलो. अंधारून आले होते. मग आम्ही असा निर्णय घेतला कि या गावातच मुक्काम करावा. सुदैवाने शाळा सापडली, वर्ग उघडा होता. आमचे नशीब म्हणजे वर्गावर पूर्ण छपर होते. जवळच्या मेणबत्या पेटवल्या, कपडे बदलले, बरोबर आणलेला शिधा काढला व आमच्यापैकी काही बल्लवाचार्य स्वयंपाकाला लागले.. बेत होता गरम खिचडी, पापड, मटकीची उसळ व भजी. खूप भुकेलेले असल्यामुळे जेवण खूपच चविष्ट लागले. जेवण झाले व पथारी पसरली. आम्ही सर्वजण खूप दमलेले असल्यामुळे एक एक जण घोरू लागला.

दिवस तिसरा – 15 ऑगस्ट 2006 : कुसूर ते उघड्यावरची रात्र – अंतर अंदाजे 18 किलोमीटर

सकाळी पाच वाजता उठलो. रात्रीची उरलेली खचडी थोडी खाल्ली व उरलेली बरोबर घेतली. कपडे बदलायची नेहेमीची कवायत केली. निघणार एवढ्यात शाळेचे गुरुजन आले. स्वातंत्र्यदिन असल्यामुळे शाळेत झेंडावंदन होते. त्यांनी आम्हाला झेंडा वंदनाला थांबायचा खूप आग्रह केला. आम्ही त्यांना खूप समजावले की आमचे निघणे खूप गरजेचे आहे. पण ऐकेचनात. नाईलाजाने आम्ही थांबलो. झेंडावंदन संपेपर्यंत ९ वाजले होते. मग आम्ही वेळ भरून काढण्यासाठी जीपने सावळे या गावी 15 मिनिटात पोहोचलो. कालचा अनुभव असल्यामुळे आम्ही मग बरोबर एक गाईंड घेतला. (नाव आठवत नाही)

आमचा मार्ग होता सावळे ते भीमाशंकर, अंतर सुमारे 19 किलोमीटर. वाटेत महत्वाची खूण म्हणजे कमळादेवीचे अगदी छोटे मंदिर. तेथून भीमाशंकरला पोहोचायला दोन तास लागतात. संध्याकळी साधारणपणे पाच वाजेपर्यंत आम्ही भीमाशंकरला पोहोचू असा आमचा अंदाज होता. चालायला सुरुवात केली. सुदैवाने पाऊस थोडा कमी झाला होता. वाटेत एक वाजता पावसातच जेवण उरकले, थोडीशी विश्रांती घेतली व पुढे निघालो.

आता पाऊस खूप जोराने सुरु झाला. हे नसे थोडके, दाट धुके पडले. इतके की दहा फुटावरचे दिसत नव्हते. आमच्या पैकी पहिल्या माणसाला शेवटचा माणूस दिसत नव्हता. रोरावणारे ओढे सोबतीला होतेच तसेच भीमाशंकरचे प्रसिद्ध घनदाट जंगल. आम्ही वाट चुकलो होतो. आमच्या बरोबर असलेला आमचा गाईड सुद्धा पुरता भंजाळलेला होता. त्याला वाट सापडत नव्हती. आम्हीच मग वाट शोधायचा प्रयत्न करत होतो. कधीतरी झाडावर अथवा दगडावर ट्रेकर लोकांनी रंगवलेला बाण दिसत होता. ज्याच्यावर आम्ही ट्रेकर मंडळी अवलंबून असतो अशा निसर्गातील खुणा धुक्यामुळे दिसत नव्हत्या. चालून पायचे तुकडे पडले होते, पण कमळादेवीचे मंदिर काही केल्या येत नव्हते. इतक्यात आम्हाला धुक्यातून काही गुरे व त्या मागून येणार गुराखी दिसला. परत जल्लोष. त्याचे नाव महादेव होते. त्याने कसे जायचे हे आम्हाला सांगितले.

पण येरे माझ्या मागल्या. आम्हाला वाट काही सापडत नव्हती व मंदिर काही येत नव्हते. मग आमच्यातील काही मंडळी वाट शोधायला गेली व आम्ही पावसात मांडी घालून बसलो. आमच्यातले विनायक ढमढेरे व सतीश कोंडरा ओरडत आले की वाट सापडली आहे. त्यांना एक रंगवलेला बाण दिसला होता. परत नेहेमी प्रमाणे जल्लोष. एकदाचे कमळादेवीचे मंदिर दिसले व जीव भांड्यात पडला. येथून साधारणपणे भीमाशंकरला जायला दोन तास लागतात. पण आम्ही इतके नशीबवान नव्हतो. मंदिरापासून पुढे चालायला सुरवात केली. धुके ओसरले होते व पाऊसपण थोडा कमी झाला होता. वाटेत आमच्या गाईडला त्याच्या गावची माणसे भेटली. ते भीमाशंकरचे दर्शन घेऊन परत येत होती. आमचा गाईड म्हणाला “मी येथून यांच्या बरोबर परत जातो कारण मला परतीची वाट सापडणार नाही. भीमाशंकर जवळ आहे तुम्ही तुमचे जा”, व तो आम्हाला सोडून गेला.

आमच्यापुढे अजून एक संकट आ वासून पुढे होते. भीमा नदी दुथडी भरून वाहत होती. तिचा रोरावणारा आवाज काळजात धडकी भरवत होता. ती नदी ओलांडून आम्हाला भीमाशंकरला जायचे होते. संध्याकाळचे साडेसहा वाजले होते व सूर्य मावळला होता. त्या माणसांपैकी एकजण म्हणाला “तुम्ही येथून नदी ओलांडू नका. पाण्याला खूप ओढ आहे. थोडे डावीकडे जा. तेथे पाण्याला कमी ओढ आहे.”. तसेच झाले. आम्ही थोडे डावीकडे गेलो. पाण्याला तुलनेने कमी ओढ होती. अंधार झाला होता. आम्ही आमचे टॉर्च काढले. सतीश कोंडराने जिवाच्या कराराने पाण्यात पाऊल टाकले. त्याच्या हातात दोराचे एक टोक होते. पैलतीराला तो पोहोचला व त्याने दोराचे टोक एका झाडाला बांधले. आम्ही सर्व मग दोराला धरून नदी ओलांडली. रात्रीचे आठ वाजले होते. पूर्ण काळोख पडला होता. त्यातच माझ्या बॅटरीने राम म्हणला.

आम्ही मग बॅटरीच्या प्रकाशात वाट शोधू लागलो. पण मग लक्षात आले की आपण आपला वेळ व श्रम उगीचच वाया घालवत आहोंत. मग आम्ही चर्चा करून असे ठरवले की रात्र जंगलातच काढायची. मग आम्ही गोल करून बसलो. भूक अनावर होती. खायचे तर दुपारीच संपले होते. आमचा असा अंदाज होता की संध्याकाळ पर्यंत भीमाशंकरला पोहोचलो कि जेवण मिळेल. पण आमचा अंदाज चुकला होता. मग खायचे शोधण्यासाठी सॅकमध्ये शोधाशोध सुरु केली.

एकाकडे पार्लेचा ग्लुकोज बिस्कटाचा छोटा पुडा सापडला. एक एक बिस्कीट प्रत्येकाच्या वाट्याला आले. मग त्यानेच भूक भागवायचा प्रयत्न केला. खूप दमलेले होतो त्यामुळे झोप अनावर येत होती. केंव्हा झोप लागली ते कळाले नाही. थोड्याच वेळात घोरण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. वरून धुवाधार पाऊस पडतच होता.

दिवस चौथा – 16 ऑगस्ट 2006 – भीमाशंकर – अंतर 4 किलोमीटर

सकाळ झाली. सहा वाजले होते. मुकुंदराव एकदम म्हणाले वाट सापडली. परत जल्लोष. भराभर सॅक पाठीवर लटकावल्या व पदयात्रा चालू केली. तासाभरात भीमाशंकरला पोहोचलो. सर्वजण भुकेलेले होतो. प्रत्येकाने दोन दोन कप चहा व संपूर्ण बिस्किटाचा पुडा हाणला. मग शेवटचे एकदा परत न बदलण्यासाठी कोरडे कपडे घातले. खाणावळीत भरपेट जेवण केले व एसटी स्टँडवर गेलो. पावसाने आमची पाठ सोडलीच नव्हती. एसटी लगेच मिळाली व आम्ही सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्याला पोहोचलो. पुण्यात आमचे मित्र मंडळी काळजीत पडली होती. 15 तारखेला आम्ही पुण्याला येणारे अजून आलो नव्हतो. त्यांनी भीमाशंकरला यायची तयारी केली होती. रेंज मिळाल्यावर लगेच फोन केला व आमची खुशाली कळवली. अशा रीतीने आमचा लोणावळा ते भीमाशंकर ट्रेक पूर्ण झाला.

या ट्रेक मध्ये मी, बापू सोनावणे व मुकुंदराव होतो. पुढे जेंव्हा आम्ही रसाळ, सुमार, महिपतगड ट्रेक केला तेंव्हा योगायोगाने तेच आम्ही तिघेजण त्या ट्रेकला होतो. वाट चुकल्यामुळे सुमारगडावर आम्ही अडकून पडलो होतो व आम्हाला जवळ जवळ १८ तास पाणी मिळाले नाही व आमची हालत नाजूक झाली होती. जेंव्हा जेंव्हा पुढे आम्ही तिघे एखाद्या ट्रेकला असू तेंव्हा बाकीचे चेष्टा करायचे कि ट्रेकचे काही खरे नाही. हा झाला गमतीचा भाग..

आमच्या लोणावळा ते भीमाशंकर या ट्रेकला पाऊस व धुके असल्यामुळे आम्ही फोटो काढू शकलो नाही. पुढच्याच वर्षी आम्ही 17 जणांनी सावळे ते भीमाशंकर ट्रेक कुठेही न चुकता पूर्ण केला. भीमाशंकरला पोहोचल्यानंतर आम्ही एक ग्रुप फोटो काढला तोच तुमच्याबरोबर शेअर करत आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3