-MPC-TOP-MOST-BANNER-I

अनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय (भाग 2)

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- शिलॉंगच्या युथ हॉस्टेलमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता पोहोचलो. माझा मित्र शरथ राव अगोदरच येऊन पोचला होता. पोचल्यावर गरमागरम ब्लॅक टी ने आमचे स्वागत झाले. डेहराडून, दिल्ली, दरभंगा, जयपूर, अहमदाबाद, बडोदा, बंगळुरू, हैद्राबाद, मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्व वयोगटामधील ट्रेकर्स मंडळी अगोदरच डेरेदाखल झालेली होती. ही आमची शेवटची बॅच होती. एकूण 45 जणांची आमची बॅच होती. रजिस्ट्रेशनचे सर्व सोपस्कार पार पडले. शिलॉंग युथ होस्टेलचे एक पदाधिकारी, ज्यांच्याकडे या ट्रेकचे समन्वयक म्हणून जबाबदारी होती त्या देबाशिष यांच्याशी फोनवरून अनेकदा बोलणे झाले होते. त्यामुळे परिचय झाला होता. त्यांच्यासाठी आणि तेथील कर्मचाऱ्यांसाठी आम्ही चितळे बंधू यांची बाकरवडी भेट दिली.

सांगायचे विशेष म्हणजे युथ होस्टेलसाठी काम करणारी प्रत्येक व्यक्ती ही समाजसेवा या भावनेने या ठिकाणी काम करते. त्यांना कोणताही पगार किंवा मानधन दिले जात नाही. प्रत्येकजण आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून ट्रेकच्या कालावधीमध्ये या ठिकाणी विनामोबदला काम करतो. देबाशिष हा मूळचा बंगाली माणूस मात्र याच्या सात पिढ्या शिलॉंगमध्ये गेलेल्या. देबाशिष देखील आपला शिक्षकी पेशा सांभाळून युथ होस्टेलचे काम पाहतात. या ठिकाणी कडक शिस्त पाळली जाते. ट्रेकच्या दरम्यान मद्यपान, धूम्रपान, असभ्य वर्तन करणाऱ्यास ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवला जातो. प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी राहण्याची स्वतंत्र सोय केलेली असते. एका मोठ्या खोलीमध्ये पुरुष मंडळींची तर दुसऱ्या खोलीमध्ये महिलांची सोय करण्यात आली होती. एक मात्र जाणवले की मनाली येथील युथ होस्टेलची इमारत आणि तेथील व्यवस्था यापेक्षा उत्तम होती.

हॉल मध्ये आम्ही सगळे एकत्र जमलो. याठिकाणी आम्हाला पुढील ट्रेकची रूपरेषा सांगण्यात आली. महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. ज्यामध्ये मेघालयच्या कलाकारांनी स्थानिक लोकनृत्य सादर केले. आमच्यापैकी काहीजणांनी गाणे सादर केली. मी देखील त्या प्रसंगाला अनुरूप ‘चितचोर’ सिनेमातील ‘आज से पहले…. आजसे ज्यादा….. ख़ुशी आजतक नहीं मिली’ हे गाणे म्हटले. या कार्यक्रमासाठी मेघालायचे पर्यटन मंत्री उपस्थित होते. मंत्री म्हटले की आपल्यासमोर चित्र उभे राहते ते म्हणजे, आलिशान गाडी, मागे-पुढे कार्यकर्त्याचा जत्था, सुरक्षा रक्षकांचा गराडा. पण हा गृहस्थ एकटाच सूटबूट परिधान करून एखाद्या कॉर्पोरेट व्यक्तीसारखा आपल्या कारमधून उतराला. आपल्या इथे साधा नगरसेवक देखील 25-30 जणांची पिल्लावळ घेऊन हिंडत असतो. शिलॉंग येथे मेघालयच्या विधानसभेची इमारत म्हणजे आपल्या येथील महापालिकेच्या एखाद्या वॉर्ड ऑफिस एवढे आहे.

पर्यटन मंत्री आले, मोजक्या शब्दात भाषण करून आम्हाला शुभेच्छा दिल्या. एवढ्यात या पूर्वीची बॅच चार दिवसाचा ट्रेक पूर्ण करून होस्टेलवर परतली. त्यांचे अनुभव ऐकले. त्यांना प्रशस्तिपत्रक, ट्रॉफी देण्यात आली. एकंदरीत त्यांच्या अनुभवावरून एक थरारक, अविस्मरणीय ट्रेक आहे अशी माहिती मिळाली. योगायोगाने या ग्रुपमध्ये चेतन रिसबूड हा मुंबईहून आलेल्या आडनाव बंधूंची भेट झाली. तेवढ्यात वेळात वेळ काढून आम्ही शिलॉंगच्या बाजारपेठेत चक्कर मारली. हवेत थंडावा होता, पण कडाका नव्हता. दिवस लवकर मावळत असल्यामुळे आठ-साडेआठच्या सुमारास आवरावरील सुरुवात होते. बाजारपेठेत थोडीफार खरेदी केली आणि होस्टेलवर परतलो.

सकाळी 8 वाजता आमच्या ग्रुपला फ्लॅगऑफ करण्यात आला. त्यासाठी मेघालायचे क्रीडामंत्री उपस्थित होते. पहिल्या दिवशी 16 किमी चालायचे होते. डेव्हिड स्कॉट नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने बांगला देशातून घोड्यावरून व्यापार करता यावा म्हणून हा मार्ग शोधून काढला म्हणून या मार्गाला डेव्हिड स्कॉट ट्रेल असे म्हणतात. आजही चेरापुंजी (सोहरा) येथे स्कॉट यांचे स्मृतिस्थळ आहे. होस्टेलवरून 26 किमी अंतरावर असलेल्या मोवफ्लोन्ग (Mawphlang) या ठिकाणी आम्हाला एका बसमधून नेण्यात आले. मोवफ्लोन्ग (Mawphlang) येथून डेव्हिड स्कॉट ट्रेलला सुरुवात होते. बसमधून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी चेरीची झाडे निळसर जांभळ्या रंगाच्या फुलांनी डवरली होती. यालाच चेरी ब्लॉसम म्हणतात. यंदा हा चेरी ब्लॉसम लवकर आला होता. थोडक्यात म्हणजे, आपल्याकडे आंब्याला जसा बहर येतो तसा त्याठिकाणी चेरीला बहर आलेला होता. काही दिवसानंतर हीच झाडे रसरशीत चेरींनी लगडून जाणार होती. या दिवसात शिलॉंग येथे चेरी ब्लॉसम फेस्टिवल भरवला जातो.

एकदा सगळ्याची शिरगणती झाली. राष्ट्रगीत झाले. ‘भारतमाता की जय’ ‘गणपतीबाप्पा मोरया’ असा जयघोष करीत आमची पदयात्रा निघाली. आमच्या सोबत बी के आणि रोनाल्डो असे दोन गाईड होते. एक सर्वांच्या पुढे होता तर दुसरा सगळ्यात मागे. म्हणजे शेवटच्या ट्रेकरबरोबर. पहिला गाईड हा सोबत मार्ग दर्शवणाऱ्या पाट्या जमिनीत रोवत जायचा तर शेवटचा रोनाल्डो त्या पाट्या गोळा करीत यायचा. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मार्ग हा दगडाने तयार केलेला आहे. काही ठिकाणी तर ब्रिटिशकालीन छोटासा दगडी पूल देखील बांधण्यात आला आहे. त्यामुळे चुकण्याचा संभव नाही.

साधारणपणे 1 किमी सरळ चालणे झाल्यानंतर आम्ही एका दरीच्या टोकाशी आलो. येथून मस्त दृश्य दिसत होते. खोल दरीमध्ये वेडीवाकडी वाट काढत नदीचा प्रवास सुरु होता. स्वच्छ ऊन पडले होते. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. याठिकाणी एकदा फोटोसेशन झाले आणि आम्ही दरी उतरण्यास सुरुवात केली. तासाभरात दरी उतरून पुन्हा पुढे चालू लागलो. या ठिकाणी मात्र थोडा खडकाळ मार्ग होता. थोडे पुढे गेल्यानंतर झुलता लोखंडाचा पूल लागला. पुलाखाली संथ वेगाने नदी वाहत होती. पूल ओलांडून उजवीकडे वळण घेऊन आम्ही पुढे निघालो. हीच नदी पुन्हा आम्हाला आडवी आली. मोठंमोठ्या खडकामधून वाट काढत पाणी वाहत होते. या ठिकाणी हात पाय तोंड धुवून फ्रेश झालो. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.

दीडच्या सुमारास आम्ही एका गावात पोचलो. गाव म्हणजे जेमतेम चार घराचे गाव. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेप्रमाणे आमचे काही सोबती पुढे निघून गेले होते तर काही मागे राहिलेले होते. या ठिकाणी सोबत आणलेले पॅकलंच खाऊन घेतले. ‘चहा मिळाला तर काय मजा येईल’ असा विचार करून आम्ही सहज चौकशी केली तर चहाची देखील व्यवस्था झाली. पहिल्यांदी आम्हाला वाटले पुन्हा तो ब्लॅक टी नशिबी येणार. कारण कालपासून सारखा ब्लॅक टी पिऊन वैताग आला होता. एवढ्यात एक मेघालयचा टिपिकल पोशाख करून एक बाई मोठ्या कपमध्ये दुधाचा चहा घेऊन आली. समुद्रमंथनात अमृत सापडल्यानंतर जो काही आनंद देव आणि दानवांमध्ये निर्माण झाला होता तसाच आनंद आम्हाला झाला. फक्त त्या चहासाठी आम्ही युद्ध केले नाही इतकेच. तो फक्कड चहा घेतला. ‘हाऊ मच ?’ असे विचारताच ‘फिप्ती रुपीज’ असे त्या महिलेने उत्तर दिले. म्हणजे दहा रुपयाला एक चहा. आमच्यासाठी किंमत महत्वाची नव्हतीच, त्यावेळेला मिळालेला चहा अधिक महत्वाचा होता. कप गोळा करण्यासाठी आलेल्या त्या महिलेच्या हातात 100 रुपयाची नोट ठेवली आणि तिच्याबरोबर एक फोटो देखील काढला. कारण त्या क्षणाला ती आमच्यासाठी देवदूत होती.

पुन्हा रानोमाळ तुडवत निघालो. वाटेत स्वच्छ सुंदर नितळ पाण्याचे झरे लागत होते. मोठमोठ्या आकाराचे फर्न (पानांचे वेल) लक्ष वेधून घेत होते. वातावरणात प्राणवायू ओतप्रोत भरलेला होता. तो छातीमध्ये भरून घेत, झऱ्याचे पाणी पीत आमची वाटचाल सुरु होती. दुपारचे दोन वाजले होते. आतापर्यंत ११ किमी चालणे झाले. अजून पाच-सहा किमी अंतर पार करायचे होते. पाय बोलायला लागले होते. सूर्य मावळतीकडे झुकायला लागला होता. अखेर दोन तास पायपीट केल्यानंतर आम्ही एका गावापाशी पोचलो. वाटेत शाळेतून परत घरी निघालेले विद्यार्थी आमच्याकडे पाहत होते. त्यांनी हसून आम्हाला ‘हॅलो’ म्हटले. आम्हीही त्यांना हात हलवून प्रतिसाद दिला. शेवटच्या पंधरा वीस पायऱ्या चढून आम्ही एका डांबरी रस्त्याला लागलो. हाच आमच्या ट्रेलचा शेवट होता. या ठिकाणी सगळे आपापला ट्रेक पूर्ण करून जमलेले होते. या गावाचे नाव होते लाडमोवफ्लोन्ग (Ladmawphlang). येथून आम्हाला बसमधून मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन जाणार होते. बस येऊन थांबली होती. या गावातील एका शाळेमध्ये आमची राहण्याची सोय करण्यात आली होती. ते ठिकाण येथून 4-5 किमी वर होते. काही उत्साही मंडळी चालत निघाली होती.

(क्रमशः)

 

 

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn