पिंपरी-चिंचवडमध्ये 774 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नागरिकांचा मतदान करताना होणारा गोंधळ, बूथवर कार्यकर्त्यांमध्ये होणारी बाचाबाची, बोगस मतदान, वृद्ध नागरिकांचा मतदान करतानाचा उत्साह आणि नव मतदारांमधील प्रथमच मतदान करतानाचा आनंद अशा वातावरणात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 127 जागांसाठी आज (मंगळवारी) मतदान झाले. 774 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सगळ्यांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 127 जागांसाठी 32 प्रभागात मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदारांचा मोठा प्रतिसाद दिसत होता. दुपारच्या सत्रात मतदानाला अल्प प्रतिसाद होता.  सायंकाळी पाचच्या नंतर झोपडपट्टी भागातील मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. वेळ संपल्यानंतरही मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र शहरामध्ये दिसून आले.

पिंपळे-सौदागर या परिसरातील सोसायटीतील नागरिकांनीही मतदानाचा हक्क बजाविला आहे. च-होली, मोशी, दिघी, बोपखेल, चिखली, पुनावळे, किवळे या ग्रामीण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. वृद्ध नागरिकांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले आहे. च-होली येथे 105 वर्षाच्या हलीमा मुलानी यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. यंदा नवमतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये साडेपाच वाजेपर्यंत अंदाजे 60 टक्के मतदान झाले आहे.

मतदान केंद्रावर उमेदवारांमध्ये वादावादीचे प्रकार झाले आहेत. बोगस मतदान, मतदार यांद्याचा घोळ, उमेदवारांची हमरी-तुमरी, मारामा-या अशा घटनांनी निवडणुकीला गालबोट लागले आहे. पिंपरी कॅम्पात राष्ट्रवादीचे उमेदवार डब्बू आसवाणी आणि भाजपचे  धन्ना आसवाणी यांच्यामध्ये मतदारांना फूस लावण्याच्या कारणावरून तुबंळ हाणामारी झाली. त्यामुळे कॅम्प परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

 

प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राहूल भोसले आणि भाजपचे उमेदवार राजेश पिल्ले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. कार्यकर्ते तलवारी हातात घेऊन एकमेकांवर धावून गेले होते. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. परिसरात तणावपूर्ण परस्थिती निर्माण झाली होती. निगडी येथील माता अमृतानंदयी मतदान केंद्रात मनसेच्या अश्विनी चिखले आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन पवळे यांच्या मुलींची मतदान केंद्राबाहेर उभे राहण्यावरून वादावादी झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.