BNR-HDR-TOP-Mobile

अनुपम सृष्टिसौंदर्याने नटलेले मेघालय (भाग 5)

एमपीसी न्यूज- तैराना (Tyrna) हे टुमदार गाव डोंगराच्या कुशीत हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात लपलेले आहे. जेमतेम 200-300 घरांचे गाव. गावातून एक रस्ता थेट घाट रस्त्याने चेरापुंजीला जातो. 12 जून 1897 रोजी म्हणजे सुमारे 120 वर्षांपूर्वी हे गाव एका प्रलयंकारी भूकंपामध्ये जमीनदोस्त झाले होते. आताचे तैराना गाव हे नव्याने वसवण्यात आले आहे. भूकंपाच्या त्या घटनेत कित्येक गावकरी मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी 28 जानेवारी 1998 रोजी एक स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. मेघालयमध्ये खासी भाषा बोलली जाते. या भाषेला स्वतःची लिपी नाही. मात्र वर्षानुवर्षे या भागात ब्रिटिशांचे प्राबल्य असल्यामुळे इंग्रजी मुळाक्षरेच या भाषेमध्ये लिहिण्यासाठी वापरली जातात. इंग्रजी भाषा दिसते म्हणून एखादा बोर्ड वाचायला गेलो, की काय लिहिलंय याचा पत्ता लागायचा नाही. नंतर लक्षात आले की हा सर्व मजकूर खासी भाषेतील असून इंग्रजी लिपीमध्ये लिहिला आहे. मेघालयच्या या प्रवासात आमच्या नजरेस एकही मंदिर किंवा मस्जिद दिसली नाही. सगळीकडे चर्च पाहण्यात आले. मेघालयमध्ये ख्रिश्चन धर्मियांची संख्या अधिक पाहायला मिळते.

आज आमची मोहीम चेरापुंजी भागात असलेल्या तीन नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहा पाहण्याची होती. त्यापैकी एक गुहा अलीकडेच उजेडात आली होती. ही ३०० मीटर लांब अंधारी गुहा आहे. विशेष म्हणजे या गुहेतून एका बाजूने प्रवेश करायचा आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचे. आतमध्ये आणखी एक फाटा दिसतो. तो मात्र कुठे घेऊन जातो ते अजून कुणालाही समजले नाही. अलीकडेच या गुहेचा शोध लागला आहे. अजून भारतीय पुरातत्व विभागाने या गुहेचा ताबा घेतला नसल्याने कोणीही जाणकार व्यक्ती या गुहेमध्ये प्रवेश करू शकते. बाकीच्या दोन गुहा त्यापैकी एक मासमाइ गुहा (mawsmai cave) आणि दुसरी अर्वाह गुहा (Arwah Cave) या पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची बरीच गर्दी असते.

आमची पलटण तैराना गावातून मामूल (MAWMLUH) गावाच्या दिशेने निघाली. सात किमी डोंगरातून चालल्यानंतर 3 किमी डांबरी सडकेने गेल्यानंतर आम्ही त्या अद्भुत गुहेजवळ जाणार होतो. प्रत्येकाच्या चालण्याच्या वेगाप्रमाणे कुणी पुढे तर कुणी मागे असे डोंगराची चढण पार करीत निघालो होतो. चार- पाच किमी गेल्यानंतर आम्ही डोंगराच्या टोकावर एका अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यापाशी पोचलो. त्या बंगल्याच्या आवारात एका रबरी पाइपमधून पाणी वाहत होते. पोटभर पाणी प्यायले. आश्चर्य म्हणजे ते पाणी पाइपमधून डोंगर उताराने गुरुत्वाकर्षणाने येत होते. चेरापुंजीला मजबूत पाऊस पडतो. त्यामुळे या भागात उन्हाळ्यात सुद्धा पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही.

आम्ही पाच-सहा जण जरावेळ गप्पा मारत असतानाच त्या बंगल्याचा मालक एका टेम्पोमधून बांधकामाचे साहित्य घेऊन आला. टेम्पो पाहताच या टेम्पोमधूनच मामूल (MAWMLUH) गावापर्यंत जाऊया अशी कल्पना आमच्या मनात आली. आम्ही त्या मालकाला विनंती करताच तो देखील तयार झाला. कारण तो देखील तिकडेच निघाला होता. ख्राईस्ट असेच काहीसे नाव त्याने सांगितले. मेघालयच्या वीज मंडळामध्ये हायड्रॉलिक इंजिनीअर म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्याने हे गेस्ट हाऊस बांधायला घेतले. आम्ही सगळे त्या टेम्पोच्या मागच्या हौद्यामध्ये उभे राहिलो. आम्हाला घेऊन टेम्पो निघाला. वाटेत काही मंडळी चालताना दिसली. ती देखील टेम्पोमध्ये बसली.

मामूल (MAWMLUH) गावात पोचल्यानंतर आम्ही ख्राईस्ट यांचे आभार मानले. त्यांच्याबरोबर एक फोटो काढला. त्यांना पैसे देऊ केले पण त्यांनी ते घेतले नाहीत. मामूल (MAWMLUH) गावात असलेल्या मामूल चेरा सिमेंट फॅक्टरीच्या मागे डोंगरामध्ये ही गुहा आहे. एका लाकडी शिडीवर चढून या गुहेत प्रवेश करावा लागतो. साधारण 50 मीटर आत गेल्यानंतर एक खडक उतरावा लागतो. तो खडक उतरला की पहिले पाऊल पडते ते बर्फासारख्या गार पाण्यात. मनाचा प्रचंड निर्धार करून आपण आत शिरतो. मग थंडगार पाणी आपला गुडघा, मांड्या, कंबर, पोट असा प्रवास करत आपल्या खांद्याला येऊन भिडते. पाणी असल्यामुळे या गुहेत अनवाणी चालावे लागते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे आणि नैसर्गिक प्रक्रियेमुळे तयार झालेली खडकाची अणकुचीदार टोके पायाला बोचू लागतात. एकमेकांचा आधार घेत, सोबत असलेल्या गाईडच्या सूचनांचे पालन करीत अखेर 15-20 मिनिटांनी आपण दुसऱ्या दिशेने गुहेच्या बाहेर पडतो. फोटो काढायचे असतील तर मोबाइलला प्लास्टिक कव्हर असणे आवश्यक. आमच्या काही सहकाऱ्यांनी गुहेच्या अंतर्गत भागात फोटो आणि शूटिंग केले.

गुहा पाहून झाल्यानंतर आम्हाला बसमधून 7 किमी अंतरावर असलेल्या मासमाइ गुहा (mawsmai cave) येथे नेण्यात आले. हे एक पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती. आता आम्ही ट्रेकर्सच्या ऐवजी पर्यटक झालो होतो. ही गुहा सुद्धा मोठी आहे. आतमध्ये मोठमोठे लाइट लावण्यात आले आहेत. नैसर्गिक प्रक्रियेतून या गुहेतील दगडांना चित्र विचित्र आकार प्राप्त झाले आहेत. काही ठिकाणी तर वाकून जावे लागते. सिनेमा, अल्बमच्या शूटिंगसाठी ही गुहा भाड्याने दिली जाते. या ठिकाणी फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर तेथून ९ किमी अंतरावरील अर्वाह गुहा (Arwah Cave) पाहून आमच्या ट्रेकचा समारोप होणार होता. अर्वाह गुहा (Arwah Cave) सुद्धा अति प्राचीन गुहा आहे. मासमाइ गुहेप्रमाणे (mawsmai cave) येथेही लाइम स्टोनचे विचित्र आकार पाहायला मिळतात. मात्र ही गुहा जास्त प्रशस्त आहे. या गुहेतून देखील एक फाटा अंधाराच्या दिशेने जातो. त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव आहे.

अशा तऱ्हेने गुहा दर्शनाचा आनंद घेऊन तेथून 51 कि मी अंतर पार करून आठ वाजता शिलॉंगला युथ हॉस्टेलमध्ये पोहोचलो. फ्रेश झालो. चहा घेतला. त्यानंतर प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्याचा कार्यक्रम पार पडला. प्रत्येकाने ट्रेकबद्दल अनुभव कथन केले. रात्री जेवण झाल्यानंतर नाच गाणी असा धम्माल कार्यक्रम झाला. उद्याचा दिवस आमच्यासाठी आपापल्या खर्चाने लोकल साईटसिईंग करण्यासाठी ठेवण्यात आला होता.

या ट्रेकमध्ये मुंबई आणि ठाण्यामधील काहीजणांची चांगलीच गट्टी जमली. त्यामुळे आम्ही सर्वजण शिलॉंग पासून 80 किमी अंतरावर असलेल्या डावकी (Dawki) गावातील भारतामधील सर्वात स्वच्छ नदी डावकी पाहण्यासाठी निघालो. सुमो गाडी करून निघालो. घाटरस्त्याने वळणे घेत आपण डावकी गावात पोचली. बांगला देशाच्या सीमारेषेवर असल्यामुळे या ठिकाणी बाजारपेठ पाहायला मिळाली. पर्यटकांची देखील मोठी गर्दी होती. ही नदी इतकी स्वच्छ आहे की पाण्यावर असलेल्या बोटीचे आरशासारखे स्वच्छ प्रतिबिंब निळ्याशार पाण्यात दिसते. आम्ही गावाशेजारील नदीमध्ये न जाता तिथूनच चार-पाच किमी अंतरावर थोडेसे आतमध्ये असलेल्या छोट्याशा गावात गेलो. या ठिकाणी बोटिंगची देखील सुविधा आहे. बोटींमधून अर्धा तास लांबवर चक्कर मारून आणतात. शिवाय रिव्हर क्रोसिंग, डायव्हिंग असे साहसी क्रीडा प्रकार देखील उपलब्ध आहेत. पाणी इतके स्वच्छ की नदीचा तळ देखील नजरेस पडतो. जलपर्यटनाचा आनंद घेऊन संध्याकाळी पुन्हा युथ होस्टेलवर परतलो. रात्री शिलॉंगच्या बाजारपेठेत चक्कर टाकली. आमचे मराठी ऐकून एक व्यक्ती आमच्यासमोर उभी राहिली. जांभुळकर असे या व्यक्तीचे नाव. मूळचे पुण्यात येरवडा भागात राहणारे. सध्या शिलॉंगमध्ये एअरफोर्स स्टेशनमध्ये ते कामाला आहेत. त्यांनी एअरफोर्स म्युझियम पाहण्याचा आग्रह केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या वाटेला लागलो. गुवाहाटी येथून संध्याकाळी ६ वाजता फ्लाईट होती. तत्पूर्वी शिलॉंग शहर पहिले. एअरफोर्स म्युझियम पहिले. जांभुळकर यांना भेटलो. येथील एका टेकडीवरून शिलॉंग शहराचे विहंगम दृश्य दिसते. ही जागा लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे त्यांची परवानगी घ्यावी लागते. शिलॉंग शहराचे ते दृश्य डोळ्यात साठवून आम्ही पुण्याच्या मार्गाकडे लागलो.

मी नेहमी म्हणतो, टुरिस्ट होण्यापेक्षा, ट्रॅव्हलर व्हा ! टुरिस्ट हा निघण्यापूर्वी सर्व प्लान करून, काय पाहायचे ?, कुठे राहायचे ? हे ठरवून निघतो. मात्र ट्रॅव्हलर हा बॅग भरतो आणि बाहेर पडतो. पुढे राहायची सोय होणार आहे का ?, खायला मिळणार आहे का ? याचा तो कधीच विचार करीत नाही. त्यासाठी शक्य असेल तेंव्हा ट्रेकमध्ये सहभागी व्हा, वेगवेळ्या स्वभावाची वेगवेगळ्या ठिकाणची माणसे भेटतात, आहे त्या परिस्थितीमध्ये राहण्याची सवय लागते. कोणत्याही गोष्टीवाचून अडत नाही. निसर्गामध्ये भटकंती केली की मनामध्ये सकारात्मक विचार येतात. शिवाय शारीरिक क्षमतेची चाचणी घेता येते. तब्येत ठणठणीत राहते. चला तर मग, युथ हॉस्टेलचा नियोजित ट्रेक कोणता आहे याची माहिती घ्या. ‘बॅग भरो और निकाल पडो’

(समाप्त)

 

 

.