Chikhli : सराईत पाच चोरट्यांकडून 11 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज – चिखली पोलिसांनी पाच सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 11 मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

रवी शेट्टी (वय 21), दीपक पवार (वय 19), युवराज राजपुरोहित (वय 19, तिघे रा. ओटास्कीम, निगडी), निकुल उर्फ कुणाल वेताळ (वय 19, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी), नागेश बनपट्टे (वय 20, रा. खराळवाडी, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस गस्त घालत असताना स्पाईन रोडवर चेरी स्वीट होम समोर दोन तरुण संशयितपणे थांबले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचा पाठलाग करून पकडले त्यात रवी शेट्टी आणि एक अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्या दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे दीपक आणि युवराज या साथीदारांसोबत मिळून नऊ मोबाईल फोन चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी दीपक आणि युवराज यांना अटक करून त्यांच्याकडून 60 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन जप्त केले.

अन्य एका कारवाईमध्ये चिखली पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पथकाला जाधव सरकार चौक, जाधववाडी येथे दोन तरुण संशयितपणे जात असल्याचे दिसले. त्यांनाही पोलिसांनी पकडून त्यांच्याकडे चौकशी करत त्यांच्याकडून 48 हजार 400 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त केले. निकुल आणि नागेश अशी या चोरट्यांनी नावे आहेत. या दोघांनी हे मोबाईल फोन एका मोबाईलच्या दुकानातून वडिलांना दाखवून आणण्याचे कारण सांगून आणले. त्यानंतर दोघेही मोबाईल फोन घेऊन पसार झाले असल्याचे सांगितले. यावरून दोघांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.