Chakan : खेडमध्ये पर्यटन विकासाला मिळणार चालना

पर्यटनवाढीच्या प्रस्तावांबाबत पर्यटनमंत्र्यांबरोबर महत्वपूर्ण चर्चा

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात पर्यटन वाढीसाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानुषंगाने खेडच्या आमदारांनी अनेक प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. या प्रस्तावांना शासनाने तत्काळ मान्यता द्यावी यासाठी नुकतीच राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमारजी रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये एकूण तीन प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, त्याच प्रमाणे पर्यटन मंत्र्यांनी काही अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

चासकमान आणि भामा आसखेड धरणे बांधून पूर्ण झाली असल्याने जलसंपदा विभागाची जागा आणि इमारती अनके वर्षे पडून आहेत. धरणाच्या बाजूला नेहमी पर्यटक आकर्षित होत असल्याने जलसंपदा विभागाच्या जागा आणि इमारती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला हस्तांतरित करून त्या ठिकाणी पर्यटकांसाठी सर्व सोयी सुविधा निर्माण करण्यात याव्यात अशी मागणी खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी केली. चासकमानची 131 निवास कक्ष , एक विश्राम गृह (रेस्ट हाउस) आणि 13 हेक्टर जमीन तसेच भामा आसखेडची जवळपास 78 निवासी कक्ष, एक विश्राम गृह , एक कम्युनिटी हॉल आणि 18 हेक्टर जमीन विनावापर पडून आहे.

या सर्व इमारती आणि जागा एमआयडीसीला हस्तांतरित करून त्या ठिकाणी पर्यटकांची राहण्याची सोय तसेच त्यानुषंगाने आवश्यक सर्व सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल एमआयडीसी मार्फत शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. खेड तालुक्यातील पुरातन अशी शंकराची 12 मंदिरे 12 ज्योतिर्लिंगाच्या धर्तीवर विकसित करण्यात येणार आहे. याबाबतचा जवळपास 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच त्याला मान्यता देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे विभागाचे व्यवस्थापक दीपक हरणे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा नियोजन अधिकारी तसेच संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते.

भामचंद्राजवळ आध्यात्म केंद्र

येलवाडी ( ता. खेड) येथील जवळपास 100 एकर शासकीय गायरान जागा पवित्र अशा भंडारा डोंगराच्या पायथ्याशी उपलब्ध आहे. त्याठिकाणी संत तुकाराम महाराज अध्यासन अध्यात्म केंद्र शासनाच्या खासगीकरण धोरणानुसार (पीपीपी) बांधण्यात यावे अशी मागणी आमदार गोरे यांनी केली. या मागणीच्या अनुषंगाने पर्यटन विभाग खासगी संस्थांना आमंत्रित करून त्याठिकाणी अध्यात्म केंद्र सुरु करण्यात येईल अशी ग्वाही पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.