Pimpri : सत्ताधा-यांचे अपयश झाकण्यासाठी अजित पवारांवर आरोप -विशाल वाकडकर

एमपीसी न्यूज – मागील निवडणूकीत भाजपा व शिवसेनेने वचननाम्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेला विविध आश्वासने देऊन सत्ता मिळविली. सत्तेत येऊन साडेचार वर्ष झाली तरी भाजप व शिवसेनेला एकाही आश्वासनाची पुर्तता करता आली नाही. आता लोकसभा व विधानसभा निवडणूका जवळ आल्या आहेत.

सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांबाबत सरकारला खुलासा मागितला आहे. त्यामुळे सरकारचे पितळ उघडे पडणार आहे. त्यापुर्वीच स्वत:च्या नाकर्तेपणावरुन जनतेचे लक्ष हटविण्यासाठी अजित पवार यांची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकार करीत आहे. अशी टिका पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे.याबाबत वाकडकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे निवडणूकांच्या तोंडावर सिंचन घोटाळा झाल्याचे आरोप करायचे तर दुसरीकडे राज्यात सिंचन घोटाळा झालाच नसल्याचा दावा इंजिनिअर्स वेलफेअर असोसिएशनने केला आहे. या असोसिएशनने नागपूर खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करायचे. गेल्या चार वर्षात राज्यात राष्ट्रवादीची ताकद खुप वाढली आहे, तसेच मुख्यमंत्री पदासाठी सक्षम चेहरा म्हणून अजितदादांची वाढती लोकप्रियता पाहून सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी अजितदादांची बदनामी करण्याचा कुटील डाव आखला आहे. परंतू भाजप सेनेला राज्यातील सुज्ञ जनता ओळखून आहे.गेल्या साडेचार वर्षात सत्ताधाऱ्यांना अजित पवारांच्या विरोधात काहीही हाती न लागण्याने जाणीवपुर्वक सरकारकडून असे प्रकार चालू असल्याचे वाकडकर यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.