Bhosari : इंद्रायणीच्या रक्षणासाठी कायमस्वरुपी नियोजन करु – आमदार महेश लांडगे

 ‘अपने अंदर यह जोश भरो, नदियों को अब साफ करो’ 

एमपीसी न्यूज –   इंद्रायणी स्वच्छता अभियान रिवर सायक्लोथॉन पुरतेच मर्यादित न राहता ‘एक पाऊल भावी पिढीसाठी – इंद्रायणीच्या रक्षणासाठी’ पुढे कायमस्वरुपी सुरु ठेवण्याचे नियोजन आहे. यामध्ये विविध, संस्था, संघटनांना सहभागी करुन घेण्यात येईल. या अभियानाच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धन करणे, पाणी आडवा – पाणी जिरवा, पशू, पक्षी यांचे संवर्धन करणे, पक्षालय सुरु करणे, उत्सव काळात निर्माल्य व मुर्ती नदीत टाकू नये यासाठी समाज प्रबोधन करणे, आठवड्यातून एक दिवस कोणतेही वाहन न वापरता फक्त सायकलने प्रवास करणे, आठवड्यातून एक दिवस इंद्रायणी नदी परिसरात श्रमदान करणे असे विविध पर्यावरण पुरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत यामध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.
पर्यावरण रक्षणासाठी व नदी प्रदुषण रोखण्यासाठी प्रशासनाबरोबरच सामाजिक संस्थांचा आणि नागरिकांचाही स्वयंस्फुर्तीने सहभाग वाढला तरच देशाला भेडसावणा-या या गंभीर प्रश्नांची सोडवणूक होईल असा आशावाद पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणा-या स्वच्छ भारत अभियान आणि नमामि गंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंद्रायणी मातेचे पावित्र्य जपण्यासाठी ‘रिवर सायक्लोथॉन 2018’ हे अभियान अंतर्गत रविवारी (दि. 2 डिसेंबर) भोसरीतील गावजत्रा मैदानावर अविरत श्रमदान संस्था, सायकल मित्र पुणे, महेशदादा स्पोट्‌र्स फाऊंडेशन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रिवर सायक्लोथॉनचे उद्‌घाटन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, मनपा स्वच्छ भारत अभियानाच्या  अंजली भागवत, राष्ट्रीय खेळाडू पूजा शेलार, निता रजपुत, रिवर सायक्लोथॉनचे निमंत्रक पै. सचिन किसनराव लांडगे, नगरसेविका भिमाताई फुगे, हिरानानी घुले, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे, सायकल मित्र पुणे संस्थेचे डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी, पुणे जिल्हा व परिसरातील राष्ट्रीय खेळाडू, छत्रपती व अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू, पिंपरी चिंचवड मनपा इंजिनिअर असोशिएशन जयकुमार गुजर, सुनिल बेळगावकर, श्रीनिवास दांगट, पिंपरी चिंचवड बार असोशिएशनचे अॅड. सुनिल कडूसकर आणि सायक्लोथॉन सहभागी झालेले हजारों खेळाडू, पालक, शिक्षक आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राज्यातील विविध नद्यांमधून आणलेल्या पाण्याने अभिषेक करुन सायक्लोथॉनचे उद्‌घाटन करण्यात आले. यामध्ये दहा कि.मी.च्या फेरीला महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते, पंधरा कि.मी.च्या फेरीला अंजली भागवत यांच्या हस्ते, पंचवीस कि.मी.च्या फेरीला आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला. पंचवीस कि.मी.च्या फेरीचे नेतृत्व पै. सचिन किसनराव लांडगे, पंधरा कि.मी.चे नेतृत्व आमदार महेश लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर आणि दहा कि.मी.च्या फेरीचे नेतृत्व शहर सुधारणा समितीचे सभापती राहुल गवळी यांनी केले.
या सायक्लोथॉनमध्ये सहा हजार सातशे सायकल प्रेमींनी ऑनलाईन, तर स्पर्धेच्या दिवशी पहाटे साडे आठशे सायकल प्रेमींनी नोंदणी केली होती. राज्यात प्रथमच सात हजारांहून जास्त सायकल प्रेमींनी सहभाग घेतलेल्या रिवर सायक्लोथॉन रॅली मधील उत्साह ऑलिम्पिंकचे आठवण करुन देणार आहे. असे अंजली भागवत यांनी शुभेच्छा देताना सांगितले. बाल सायकल पटूंपासून एैंशीहून जास्त वय असणा-या ज्येष्ठांनी यामध्ये सहभाग घेतला होता. सर्वांना प्रमाणपत्र, पदक, तुळशीचे रोप, टि शर्ट, टोपी देण्यात आली. लकी ड्रॉ विजेत्या सायकल प्रेमींना एसएसएस सायकल वर्ल्ड यांच्या वतीने सायकल भेट देण्यात आली. रुग्णवाहिकेची सेवा रुबी एल केअर रुग्णालयाने दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सातशेहून जास्त स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
 ‘अपने अंदर यह जोश भरो, नदियों को अब साफ करो’  असे फलक दाखवून पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती केली. तीनही फेरींचे ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुर्तफा मानवी साखळी करुन तर महिला, भगिनींनी चौकाचौकात रांगोळीच्या पायघड्या घालून स्वागत केले.
‘रिवर सायक्लोथॉन 2018’ हे अभियानातंर्गत शहरातील सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत तेवीस हजार व चित्रकला स्पर्धेत सेहचाळीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.