Pimpri : सुरेखा हिरवे यांचा सेवानिवृत्ती समारंभ

एमपीसी न्यूज –  नवनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पर्यवेक्षिका आणि माजी मुख्याध्यापिका सौ. सुरेखा प्रकाश हिरवे यांचा जाहीर सत्कार समारंभ  झाला.
आदर्श व विद्यार्थीप्रिय शिक्षिका असणाऱ्या हिरवे यांनी उपशिक्षिका ते मुख्याध्यापिका असा प्रवास करत आपल्या तेहतीस वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना घडवले. केवळ शिक्षणच नव्हे तर मराठी साहित्य, वाचन संस्कार, संगीत, वक्तृत्व, नाटक, इतिहास आदी विषयांमध्ये त्यांनी मुलांमध्ये आवड निर्माण केली.
सत्काराच्यावेळी  संस्थापक गोविंद दाभाडे म्हणाले की, ” शिक्षकांनी व्यासंग जोपासला पाहिजे. शिक्षक अष्टपैलू असतील तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला चालना मिळते. देशाची भावी पिढी उज्ज्वल करण्यामध्ये शिक्षकाचे योगदान मोलाचे आहे. काममध्ये श्रद्धा असेल तर उच्च ध्येयाकडे पोहोचता येते. संस्था अडचणीत असताना सौ. हिरवे यांच्यासारख्या शिक्षकांनी मदत केली. अशा ऋणामुळेच संस्थेचा वटवृक्ष आज बहरू शकला.”
विविध वक्त्यांनी हिरवे यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. उत्तरायुष्य आनंददायी आणि निरामय होण्यासाठी सदिच्छा दिल्या. सर्व शिक्षकांच्या वतीने कोकिळा आहेर यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थापक गोविंद दाभाडे, सचिव डॉ. अश्विनी दाभाडे, प्राचार्या  साधना दातीर, उपप्राचार्य विजय बच्चे, प्रकाश हिरवे, मुख्याध्यापक राजू माळे तसेच सरस्वती प्राथमिक, सरस्वती माध्यमिक मधील सर्व शिक्षक आदी उपस्थित होते.प्रास्ताविक अर्चना बुधकर यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा वाळुंज यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप काळोखे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1