Vadgaon Maval : तुलसी रामायण कथा सोहळ्याला बुधवारी प्रारंभ

रामायणाचार्य रामराव महाराज ढोक करणार निरुपण

एमपीसी न्यूज- मावळ प्रबोधिनी व मावळ विचार मंचच्या वतीने वडगाव येथे बुधवार दि 5 डिसेंबर ते मंगळवार दि 11 डिसेंबर या कालावधीत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचा तुलसी रामायण कथा सोहळा आयोजित केला आहे. अशी माहिती मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र (अप्पा) भेगडे व मावळ विचार मंचचे अध्यक्ष भास्करराव (अप्पा) म्हाळसकर यांनी दिली.

प्रारंभ नव्या पर्वाचा, वारसा जनसेवेचा आणि निर्धार परिवर्तनाचा या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित केला आहे. येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणामध्ये दररोज सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक हे तुलसी रामायण कथा सांगणार आहेत.

तालुक्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन होईल. दि 5 डिसेंबर रोजी ग्रंथ महात्म्य व शंकर पार्वती विवाह, दि 6 डिसेंबर रोजी श्री राम जन्म सोहळा, दि.7 डिसेंबर रोजी अहिल्या उद्धार व सीता स्वयंवर, दि 8 डिसेंबर रोजी राम वनवास, केवट कथा, दि 9 डिसेंबर रोजी भरत भेट व सीताहरण, दि 10 डिसेंबर रोजी वाली वध व लंका दहन तर दि 11 डिसेंबर रोजी रावणवध व रामराज्याभिषेक सोहळ्यावर प्रवचन होणार आहे.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार बाळा भेगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दररोज सुमारे शंभर जोडप्यांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. कार्यक्रमासाठी मंडप, सुमारे पाच हजार भाविकांची बैठक व्यवस्था व महसूल भवनाच्या प्रांगणात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये रामायणसाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंपरा व संस्कृतीचे उच्च उदात्त दर्शन घडविणारा हा सोहळा आहे. मानवी जीवनाचे सार ऐकण्यासाठी व आत्मसात करण्यासाठी भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे. असे आवाहन रवींद्र भेगडे व भास्करराव म्हाळसकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.