Pimpri : राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालावर रंगकर्मींची नाराजी

एमपीसी न्यूज  – पिंपरी चिंचवड विभागात पार पडलेली 58 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा यंदा चांगलीच चर्चेत राहिली. स्पर्धेचे स्थळ म्हणून निवडलेल्या आणि नुकत्याच नुतनीकरण झालेल्या प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे स्पर्धा चर्चेत होती. त्यातच स्पर्धेच्या अनपेक्षित निकालानंतर प्रेक्षक आणि रंगकर्मींच्या रोषामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये स्पर्धेचे केंद्र असलेल्या चिंचवडच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 15 नोव्हेंबर (गुरुवार)पासून  सुरु झालेली स्पर्धा 3 डिसेंबरला संपली.  स्पर्धेचे परिक्षण गुरु वठारे(सोलापूर), वसंत सामडेकर(अमरावती), पूर्वा खालगावकर (रत्नागिरी ) यांनी केले. स्पर्धेत पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील  एकूण 17 संघांनी सादरीकरण केले.  मात्र स्पर्धा संपल्यानंतर एका दिवसाच्या विलंबाने आलेल्या निकालावर शंका निर्माण झाली.  तर अनेक प्रश्न रंगकर्मींनी शासनाला प्रश्न  विचारले असून निकालाबाबत रोष व्यक्त केला आहे. यासंदर्भातील पत्रकार परिषद घेऊन संघांनी आपली मते मांडली.

राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालात होणा-या फेरफारीच्या घटना, त्यामुळे त्रस्त झालेले कलाकार, उत्तम कलाकृतींना डावलल्यामुळे रंगकर्मींना येणारी निराशा, गुणवत्ता नसलेल्या परीक्षकांची निवडणी या मुद्द्यांवर रंगकर्मींनी आपली मते पत्रकार परीषदेत मांडली. यासंदर्भात समन्वयकांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता समन्वयक सायली कोल्हटकर म्हणाल्या की,  हा निकाल अनपेक्षित लागला असल्याचे माझे वैयक्तीक मत आहे. मात्र प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. मात्र शासनाच्या नियमानुसार आम्ही प्रतिक्रीया देऊ शकत नसल्याचे  त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षकांची पात्रता तपासण्याची वेळ आली आहे-  हनुमंत मोरे ( रंगकर्मी- स्वराज्य एज्युकेशन एण्ड सोशल अकॅडमी) महाराष्ट्र राज्यनाट्य हौशी स्पर्धेत जे परिक्षक निवडले जातात त्यांची गुणवत्ता तपासली जात नसल्याचा आमचा आरोप आहे. परीक्षकांची काय पात्रता आहे हे शासनाने तपासून मगच त्यांना परीक्षण करण्याची संधी द्यायला हवी. मात्र तसे न होता कोणालाही परिक्षक म्हणून नेमले जात असल्यामुळे या अडचणी समोर येत आहेत.

परीक्षकांनी चुकीचा निकाल दिला आहे-  विनय सोनवणे (रंगकर्मी -जिव्हाळा बालसंगोपन संस्था, पुणे)

महाराष्ट्र राज्य नाट्य हौशी स्पर्धा 2018-19 या वर्षीचा निकाल चूकीचा दिला असल्याचा आमचा आरोप आहे. उत्तम कलाकृती डावलून ज्या नाटकाचे सुमार प्रयोग झाले त्या नाटकांना नंबर दिला गेला आहे. परीक्षकांचा निर्णय चूकीचा असून इतर संघांच्या कलाकृतीवर अन्याय झाला आहे. या स्पर्धेत ‘महाशून्य’ हे नाटक उत्तम दर्जाचे झाले असून ते पहिल्या दोन नंबरात येणे अपेक्षित होते. तसेच ‘शौझिया’,’प्लॅनिंग’ या नाटकांचा देखील विचार होण्याची आवश्यकता होती. परीक्षकांनी या निकालाबाबत आम्हाला कारणे द्यावी आणि स्पर्धा पुन्हा घ्यावी अशी मागणी आम्ही राज्य शासनाला करीत आहोत.

कलाकृतीची दखल घेतली नाही – प्रभाकर पवार – (रंगकर्मी -थिएटर वर्कशॉप कंपनी)

आमच्या ‘महाशून्य’ या नाटकाचा प्रयोग उत्तम झाल्याची दाद आम्हाला शहरातील रंगकर्मी, सहस्पर्धक, कलाकार आणि प्रेक्षकांनी  दिली. वेगळा विषय घेऊन आम्ही स्पर्धेत उतरलो होतो. आम्हाला 600 प्रेक्षकांनी कौतुक केलेल्या कलाकृतीची मात्र परीक्षकांनी मात्र आमच्या कलाकृतीची दखल घेतली नाही. या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत मागील काही वर्षांपासून उत्तम कलाकृती करणा-या संघावर अन्याय होत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. याबाबत शासनाने काही दखल घेऊन कलाकारांना न्याय द्यायची गरज आहे. अथवा आम्ही निषेध म्हणून पुढील वर्षापासून या स्पर्धेत सहभाग घेणार नाही.एकमताने निकाल दिला – गुरु वठारे

मी रंगभूमीवरचा माणूस आहे. आम्ही शासनाच्या नियमांमध्ये राहून आम्ही एकमताने तिघा परीक्षकांनी  निकाल दिला आहे. आमच्या मते निकाल आम्ही योग्य दिला आहे.

निकाल अनपेक्षित   पराग पालकर –(प्रेक्षक)

आम्ही दररोज राज्य नाट्य स्पर्धेला हजेरी लावली आहे. प्रत्येक नाटक पाहिले आहे. मात्र परीक्षकांनी दिलेला निकाल हास्यास्पद आणि अनपेक्षित असाच आहे. ज्या नाटकांचा दर्जा सुमार होता अशी नाटके नंबरात घेतल्यामुळे निकालावरच प्रश्न निर्माण होत आहेत. या निकालाबाबत शासनाने काही कृती करत ज्या रंगकर्मींनी उत्तम सादरीकरण केले त्यांना न्याय द्यायला हवा.

महाशून्य’ नाटक मनाला भिडलं- संतोष गावडे (प्रेक्षक)

यंदा झालेली राज्य नाट्य स्पर्धेतील सगळ्या कलाकृती पाहिल्या. राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेले ‘महाशून्य’ नाटक प्रेक्षकांच्ये मनाला भिडणारे  होते. या नाटकात नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनय, संगीत सगळ्या बाबी उत्तम होत्या. मात्र निकाल वेगळाच लागला आहे. याचबरोबर अरण्य नाटक देखील छान झाले. मात्र  परीक्षकांनी दिलेला निकाल अगदीच अनपेक्षित होता.

याबाबतीत सहसमन्वयक राजू बंग म्हणाले की,  शासनाची कोणतीही स्पर्धा असो. त्यामध्ये शासनाचा निर्णय अंतिम राहील, असे नमुद केलेले असते. याबाबतीत स्पर्धकांनी शासनाबरोबर चर्चा केली पाहिजे. ज्यांना कोणाला यश मिळाले नाही त्यांनी परीक्षकाला विचारणे गरजेचे होते. स्पर्धकाने आमच काय आणि कुठे चुकले हे परीक्षकाला विचारायला हवे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.