Pimpri: ‘शिवसेनेचा खासदार आला , की पंतप्रधान मोदी रस्ता बदलतात’

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत 

एमपीसी न्यूज – तुम्ही दिल्लीत जा आणि शिवसेना खासदारांचा दरारा बघा,  शिवसेनेचा खासदार आला की पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रस्ता बदलतात. आम्ही फाटके लोक आहोत. आम्हाला मंत्री व्हायचे नाही. आम्ही दिल्लीत असेच फाटक्या सारखे फिरतो. त्यामुळे शिवसेना खासदाराला भलेभले टरकून असतात असे शिवसेना नेते,  खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी  ‘आपला वैभवशाली मावळ लोकसभा मतदार संघ’ या लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आज (शनिवारी)  खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार राऊत म्हणाले, ”लोकशाहीच्या मंदिरात जनताच दुर्जानांना निवडून देत आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी ग्रामपंचायतीला पडलेले लोक खासदार, आमदार झाले आहेत. लाटेवर आपण वाहून जातो. जोपर्यंत लाटेवर वाहून जायचे थांबवत नाही. तोपर्यंत दुर्जन लोक निवडून येणार आहेत. त्यासाठी सत्य साहित्य क्षेत्रातील नागरिकांनी जागृती केली पाहिजे. ज्याच्यावर सगळ्यात जास्त गुन्हे आहेत. तो नगरसेवक होत आहे”.

ज्याच्यावर जास्त चार्जशिट, किती वेळा जेलमध्ये गेला. कितीवेळा बाहेर आला, त्यावर तो निवडून येणार की नाही, हे ठरविले जाते, अशी खंत व्यक्त करत खासदार राऊत म्हणाले, ”देशाच्या राजकारणात जुन्या तोडीची, टोलेजंग मानसे राहिली नाहीत. पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ भागाला मोठी परंपरा आहे. चांगली लोक निवडून आणण्यासाठी मतदारांनी ठरविणे गरजेचे आहे”.

”बाळासाहेबांना मानस ओळखण्याची दृष्टी होती. त्यांच्यामुळे आम्ही आज या पदावर पोहचलो आहोत. महाराष्ट्रात विविध भाषांसह ठाकरी भाषा देखील आहे. या भाषेने भल्या-भल्यांची झोप उडविली आहे. संघर्ष, अनुभवातून ही भाषा निर्माण झाली आहे. त्यातील ठिणग्या आमच्यापर्यंत आल्या असून त्या जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. इतर राजकीय पक्षांनी राजकारणात दलाल निर्माण केले. बाळासाहेबांनी शूर आणि वीर निर्माण केले. चांगल्या कामाचे ते नेहमीच कौतुक करत असे. बाळासाहेब मोठ्या मनाचे लोकनेते होते. कोण काय करु शकते. याची बाळासाहेबांना खात्री होती”, असेही राऊत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.