Chakan : किरकोळ भांडणाच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला 

एमपीसी न्यूज – मित्राबरोबर झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून चिडलेल्या आठ जणांच्या टोळक्याने संगनमताने दोघांना शिवीगाळ, दमदाटी व दहशतीचा प्रचंड थरार करत बेकायदा गर्दी, जमाव जमवून हाताने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत तसेच जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी कोयता, लोखंडी रॉड व दगडाने त्यांना गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोये ( ता. खेड ) गावच्या हद्दीत रात्री उशिरा झालेल्या या भांडणात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, चाकण पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी ( दि. 8 डिसेंबर ) एकुण आठ जणांवर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

अमोल ज्ञानेश्वर राळे ( वय – 17 वर्षे, रा. कोये, ता. खेड,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अमोल राळे व राहुल राळे ( दोघेही रा. कोये, ता. खेड ) अशी लोखंडी कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. चाकण पोलिसांनी याप्रकरणी आकाश साहेबराव राळे ( रा. कोये ), शुभम बाळू भुजबळ व सोमनाथ राजेंद्र भुजबळ ( रा. चाकण ), अमर सुरेश राळे, विकास सुरेश राळे, निशांत दत्तात्रय महाले, वैभव संतोष बच्चे ( रा. कोये ) व किशोर राजेंद्र भुजबळ ( रा. चाकण. ) यांच्यावर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोये ( ता. खेड ) येथे शुक्रवारी ( दि. 7 डिसेंबर ) सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान अमोल ज्ञानेश्वर राळे याचा मित्र तेजस साहेबराव राळे याच्याबरोबर वरील लोकांची किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. त्यामुळे चिडलेल्या वरील सर्वानी संगनमताने अमोल राळे व त्याचा चुलत भाऊ राहुल राळे यांच्या कपाळावर, हाता पायावर, छातीवर व पाठीवर घातक हत्याराने जीवघेणा हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले.
अमोल राळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी वरील आठ जणांवर गु.र.नं.1179/2018 नुसार, भा.द.वि.कलम 307, 143, 147, आर्म एकट 3 ( 25 ) प्रमाणे 148, 149, 323, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.