Talegaon : पुणे जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते केशवराव तुकाराम वाडेकर यांचे आज (रविवारी) दुपारी दोनच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

तळेगाव दाभाडेमधील इंद्रायणी कॉलनीत राहत्या घरी पाच वाजल्यापासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता अंत्ययात्रा निघणार असून बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी दिली.

केशवराव वाडेकर हे जनसंघापासून भाजप पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. पक्षाच्या प्रदेश पातळीवर व राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या शब्दाला महत्व होते. पक्ष संघटनेवर त्यांची मजबूत पकड होती. मावळ भाजपमध्ये त्यांचा निर्णय अंतिम मानला जात असे. मागील 25 वर्षांपासून मावळ विधानसभा मतदार संघाचा प्रतिनिधी भाजप पक्षाचा आहे. त्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुपलेखाताई ढोरे, दिगंबर भेगडे, बाळा भेगडे हे आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना मावळ भाजपचे चाणक्य म्हणूनही ओळखले जात होते.

केशवराव वाडेकर यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काही काळ काम केले आहे. तळेगाव नगरपरिषदेत अनेक वर्ष भाजपची सत्ता असण्यामागे त्यांचे अथक परिश्रम आहेत. त्यामुळे मावळचे ‘किंग मेकर’ अशीही त्यांची ओळख होती. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे ते खजिनदार होते.

मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. आज (रविवारी) अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मावळ भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.