Pune : यंदाचा 17 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 10 ते 17 जानेवारी दरम्यान

150 पेक्षा अधिक चित्रपट पाहण्याची पुणेकरांना संधी

एमपीसी  न्यूज – ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात ‘पिफ’ यंदा 10 ते 17 जानेवारी, 2019 दरम्यान होणार आहे.  ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग 150 इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या ‘पिफ’ची प्रमुख ‘थीम’ असून त्याअंतर्गत महोत्सवात महात्मा गांधी यांना चलचित्र आदरांजली वाहण्यात येणार आहे. महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राज्याचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेल्या व दरवर्षी सिनेप्रेमींच्या उत्सुकतेचा विषय ठरणा-या ‘पिफ’ मध्ये या वर्षी 114 देशांमधून 1634 चित्रपट प्राप्त झाले होते. यातील निवडक असे 150 हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. चित्रपटांबरोबरच चित्रपटांशी संबंधित विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रदर्शन यांचाही महोत्सवात अंतर्भाव असेल, असेही डॉ. पटेल यांनी यावेळी नमूद केले.महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, ‘पिफ’चे निवड समिती सदस्य मकरंद साठे, सतीश आळेकर, अभिजित रणदिवे या वेळी उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पुण्यात 4 ठिकाणी 10 स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. यात पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता, सिटी प्राईड मंगला आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) या चित्रपटगृहांचा समावेश आहे.

या वेळी बोलताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “महात्मा गांधी यांचे योगदान केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्यापुरतेच मर्यादित नाही. त्यांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. अनेक भारतीय आणि जागतिक चित्रपटांमधून त्याचा प्रत्यय येतो. या वर्षी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनावरील आणि शिकवणीवरील काही जागतिक दर्जाचे चित्रपट ‘पिफ’मध्ये पाहायला मिळतील.’

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील चित्रपट विभाग खालीलप्रमाणे –

स्पर्धात्मक विभाग –
1) वर्ल्ड काँपिटिशन
2) मराठी काँपिटिशन

इतर विभाग –
1) पुरस्कारार्थी
2) विद्यार्थी विभाग- ‘लाईव्ह ऍक्शन’ आणि ‘ऍनिमेशन’
3) थीम-‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी
4)  माहितीपट
5)  देश विशेष- (कंट्री फोकस)
6)  ट्रिब्यूट
7)  आशियाई चित्रपट
8)  जागतिक चित्रपट
9)  सिंहावलोकन (रेट्रोस्पेक्टिव्ह)
10) भारतीय चित्रपट
11) आजचा मराठी चित्रपट
12) विशेष स्क्रीनिंग
13) कॅलिडोस्कोप

या महोत्सवातील चित्रपट पाहण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती-या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून 11 डिसेंबरपासून या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीस सुरूवात होणार आहे. सिनेप्रेमींनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांना मिळालेल्या नोंदणी क्रमांकासह सिटी प्राईड- कोथरूड, सिटी प्राईड- सातारा रस्ता किंवा सिटी प्राईड मंगला चित्रपटगृह येथे जाऊन ‘स्पॉट रजिस्ट्रेशन’ करणे अपेक्षित आहे. हे स्पॉट रजिस्ट्रेशन 20 डिसेंबरपासून वर दिलेल्या 3 ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 7:30 या वेळात करता येणार आहे.18 वर्ष पूर्ण असलेले विद्यार्थी,’फिल्म क्लब’चे सभासद व ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील) यांना ओळखपत्र दाखवून रुपये ६०० मध्ये नोंदणी करता येणार आहे,तर इतर इच्छुकांसाठी नोंदणी 800 शुल्क रुपये इतके आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.