Pimpri : पोलीस आयुक्‍तालयाचे काम अंतिम टप्प्यात; स्थलांतर पुन्हा लांबले !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड आयुक्तालय चिंचवड येथील इमारतीमध्ये सोमवारी (दि. 10) स्थलांतर होणार होते. मात्र इमारतीत सुरु असलेले आयुक्तालयाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने स्थलांतराचा मुहूर्त आणखी लांबणीवर गेला आहे. इमारतीमधील विविध कक्षांची कामे अंतिम टप्प्यात आली असून येत्या दहा ते पंधरा दिवसात सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आयुक्तालयाच्या इमारतीचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे, तेथे फर्निचर देखील आले आहे. मात्र फर्निचर व्यवस्थित लावणे, अधिकाऱ्यांची कार्यालये तयार करणे, आयुक्तालया समोरील रोड व पार्कींग, लाईट फिटींग अशा अनेक बाबी अजूनही अपूर्ण असल्याने तूर्तास तेथे आयुक्तालय जाणे शक्‍य नाही. मात्र येत्या 20 ते 25 डिसेंबरपर्यंत ते स्थलांतरीत करण्यात येईल. आयुक्तालय, अधिकारी यांचे पूर्णपणे स्थलांतर होऊन कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर रीतसर उदघाटन करण्यात येणार आहे. उदघाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात येणार असल्याची पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

चिंचवड येथे असलेले पोलीस उपायुक्तालय देखील वाकड येथे स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव आहे. आयुक्तालयाबरोबरच उपायुक्तालय देखील स्थालांतरीत करण्यात येणार आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्तांसाठी हे कार्यालय देण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यापासून आयुक्तालयाचे अंतिम नोटिफिकेशन काढण्यासाठी कित्येक महिन्यांचा कालावधी लोटला. नोटिफिकेशन नंतर आयुक्तालय सुरु करण्यासाठी अनेक मुहूर्त टळून गेले. पण आयुक्तालय कार्यान्वित होणे या ना त्या कारणाने पुढे ढकलत गेले. अखेर 15 ऑगस्ट रोजी आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर एका महिन्यात चिंचवड येथील आयुक्तालयाची इमारत सज्ज होणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र चार महिने झाले तरी इमारत सज्ज होईना. आता आयुक्तालय स्थलांतरणासाठी 20 ते 25 डिसेंबर दरम्यानचा मुहूर्त सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.