Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी अतिवरिष्ठ अधिका-यांची मुंबईत बैठक

एमपीसी न्यूज – अपुरी व नादुरुस्त वाहने, आयुक्तालयाच्या इमारतीचे संथ गतीने सुरु असणारे काम आणि तुटपुंजे मनुष्यबळ यामुळे आयुक्तालयासमोर मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. पोलीस आणि राजकीय स्तरावर याबाबत मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू आहे. परिणामी पुणे ग्रामीण पोलीस व पुणे पोलीस आयुक्तालयाच्या मनुष्यबळ, वाहने व इतर साधनांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयासाठी वाटणी होणार आहे. याबाबत थेट मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात आज (मंगळवारी) बैठक होणार असल्याचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी सांगितले.

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत आणि विविध अडचणींमुळे प्रलंबित असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाला अखेर स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त मिळाला. आहे त्या परिस्थितीत चिंचवड ऑटो क्लस्टर इमारतीमध्ये आयुक्तालय सुरू करण्यात आले. मात्र तुटपुंजे मनुष्यबळ, अपुरी आणि नादुरुस्त वाहने अशा अनेक अडचणी आयुक्तालयापुढे उभ्या राहिल्या. पोलीस निरीक्षकांपासून अनेक वरिष्ठ व अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कामचलाऊ वाहने देण्यात आली होती. तर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये वाहनांची कमतरता भासत होती. याबाबत पोलीस आयुक्तांपासून स्थानिक आमदार खासदारांनीही मोठा पाठपुरावा केला होता. तसेच अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांनी चिखली पोलीस ठाण्याच्या उदघाटनप्रसंगी पुणे आणि पिंपरी पोलीस युक्तालयाच्या मनुष्यबळाची संख्यात्मक तुलना करून ही बाब पालकमंत्री गिरीश बापट यांच्या लक्षात आणून दिली होती.

दरम्यान अनेक स्तरांवरून होणाऱ्या पाठपुराव्याचे सकारात्मक परिणाम झाले असून गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लक्ष घातले आहे. तसेच मनुष्यबळ आणि इतर आवश्यक बाबींची पडताळणी करून अहवाल सादर करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आज दुपारी दोन वाजता मुंबई महासंचालक कार्यालयात बैठक होणार असून ग्रामीण पोलीस अधीक्षक, पुणे पोलीस आयुक्त व पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.