Pune : आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी चालतोय न्यूझीलंडचा पदयात्री माइक बटलर

एमपीसी न्यूज- पालघर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना चांगले शिक्षण मिळावे याकरिता खास न्युझीलंडवरुन एक पदयात्री मुंबईत आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, वाडा असा 570 कि.मी चा प्रवास करून हा पदयात्री समाजातील विविध घटकांकडे दान मागणार आहे. 67 वर्षाच्या या पदयात्रीचे नाव आहे माइक बटलर. शनिवारी माइक बटलर यांचे आगमन पिंपरी-चिंचवड शहरात झाले.

राजमार्ग परियोजना निर्देशक, विश्व बँक परियोजना सडक परिवहन विभागाचे केंद्रीय उपसचिव संकेत भोंडवे यांच्या निगडी प्राधिकरणातील निवासस्थानी माइक बटलर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने फेटा बांधून, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीमती सुमन भोंडवे, अमोल भोंडवे आणि भोंडवे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. माइक बटलर यांच्या पदभ्रमण मोहिमेला संकेत भोंडवे यांचे सहकार्य लाभत आहे.

पंढरपूर, शिर्डी पालखी सोहळ्यासाठी अनेक भाविक वारकरी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत जातात. अशाच प्रकारे वाडा येथील 5 शाळांना संगणक, खेळाचे साहित्य व आदी शैक्षणिक मदत करण्यासाठी माइक बटलर खास न्यूझीलंडवरून भारतात आले आहेत. या पदयात्रेत माइक बटलर 570 कि.मी चा पायी प्रवास करणार आहेत.

सोमवारी (दि. 10) सकाळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी झेंडा दाखविल्यानंतर या दानयात्रेला सुरुवात करण्यात आली. शनिवारी (दि. 8) त्यांचे पुण्यात आगमन झाले. आज चाकणच्या दिशेने त्यांची पदयात्रा सुरु झाली आहे. नारायणगाव, संगमनेर, नाशिक, इगतपुरी मार्गे ते त्यांची पदयात्रा 30 डिसेंबर रोजी पूर्ण होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.