Pimpri : नियंत्रण कक्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेर !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा नियंत्रण कक्ष सुरु होऊन पाच महिने उलटूल गेले तरीही कंट्रोल रुममधील दयनीय अवस्था काही सुधारण्याचे नाव घेत नाही. संपूर्ण आयुक्तालयाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नियंत्रण कक्ष देखील रडत खडत सुरु आहे. आयुक्तालय सुरु होऊन पाच महिन्यानंतर देखील नियंत्रण कक्ष सुरळीत करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही.

कंट्रोल रुममध्ये सुरु असणाऱ्या भोंगळ कारभाराकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचेच लक्ष नसल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे. सुरुवातीला नवीन संसार म्हणून तेथे होणाऱ्या सर्व गैरसोयीकडे व कामकाजाकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र पाच महिन्यांनी देखील परिस्थिती जैसे थे’ राहिल्याने नियंत्रण कक्षासह पोलीस आयुक्तालय सुरळीत होण्यासाठी आणखी किती वेळ लागणार असल्याचा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मंगळवारी (दि. 11) नियंत्रण कक्षात इंटरनेट नसल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. याबाबत चौकशी केली असता इंटरनेटचे बिल भरले नसल्याचे उघड झाले. याबरोबरच तेथे असणारे अपुरे व सतत बदलत राहणारे मनुष्यबळ हे देखील भोंगळ कारभारात आणखी भर घालत आहेत.

पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांच्या पगाराचा प्रश्न नुकताच ऐरणीवर आला आहे. त्यातच भर म्हणून आयुक्तालयाकडे कार्यालयीन खर्चासाठी देखील पैसे नसल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होत आहे. नव्याने आलेल्या कर्मच्याऱ्याला आयुक्तालयाची आणि विविध पोलीस ठाण्याची प्रत्यक्ष हद्द माहिती नसते. त्यामुळे एखादा तातडीचा कॉल आला तर तो कोणत्या पोलीस ठाण्याकडे द्यायचा हा नियंत्रण कक्षाचा नेहमीच गोंधळ होत आहे. जनसंपर्क ही बाब वरिष्ठ अधिकारी मनावर कधी घेणार? तसेच मनावर घेणार की नाही ? याबाबतही शंका आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला कर्मचा-यांसह अधिका-यांचीही वानवा आहे. त्यामुळे एकाच अधिका-याकडे अनेक खात्यांचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे अधिका-यांची देखील दमछाक होत आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्याकडे आयुक्तालयातील अनेक विभागांची जबाबदारी असताना नियंत्रण कक्ष देखील त्यांच्याकडेच देण्यात आला आहे. अजूनही पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांनी पोलीस मदतीसाठी 100 क्रमांकाला फोन केला असता हा फोन पुणे आयुक्तालयाकडे लागतो. तिथले कर्मचारी पिंपरी-चिंचवड आयुक्तालय नियंत्रण कक्षाकडे फोन वळविण्याऐवजी नागरिकांना नियंत्रण कक्षाचा नंबर देऊन हात वर करतात. त्यामुळे देखील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.