Wakad : इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सूट मिळण्याचे आमिष दाखवून एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – इन्शुरन्स कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून विमा पॉलिसीच्या मिळणा-या रकमेवर सूट मिळविण्यासाठी ठराविक रक्कम अगोदर भरावी लागणार असल्याचे सांगून पॉलिसी धारकाकडून 91 हजार 631 रुपये ऑनलाईन घेतले. हे पैसे पॉलिसीसाठी न भरता त्यांची फसवणूक केली. ही घटना गणेशनगर थेरगाव येथे घडली.

माल्याद्री मालाकोंडाय्या पल्लाला (वय 45, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनीषकुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माल्याद्री यांची एका विमा कंपनीत पॉलिसी आहे. 28 नोव्हेंबर रोजी आरोपी मनीषकुमार याचा फिर्यादी यांनी फोन आला. त्याने संबंधित विमा कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. माल्याद्री यांनी पॉलिसीची रक्कम 23 डिसेंबर पूर्वी भरली तर त्यांना ठराविक रकमेची सूट मिळणार आहे, असे सांगत त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना स्वतःचा बँक खाते क्रमांक पाठवून त्यावर फिर्यादी यांना 91 हजार 631 रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आरोपीच्या खात्यावर पैसे भरले. मात्र आरोपीने ते पैसे पॉलिसीसाठी न भरता त्याचा अपहार केला. यावरून त्याच्याविरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.